Tariq Khan : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तारिक खान यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. तारिक खान यांना त्यांच्या फोनवर दोन दिवसांपूर्वी एक फोन आला होता. यावेळी फोनवरील व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य असल्याचं सांगत मर्यादेत राहण्याचा इशारा दिल्याचा दावा तारिक खान यांनी केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

या संदर्भातील एका संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तारिक खान यांना अपमानास्पद आणि धमकी देणारी भाषा वापरण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे. तसेच कथित ऑडिओ क्लिपमध्ये “सावध राहा नाहीतर तुमचा नंबर पुढे येईल, काळजीपूर्वक बोला”, असे शब्दांत ऑडिओ क्लिपमध्ये धमकी देण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

तारिक खान यांनी काय म्हटलं?

सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते तारिक खान यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, “गेल्या दोन महिन्यांपासून मला शिवीगाळ करणारे आणि धमकीचे फोन येत होते. मात्र, मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण शुक्रवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने फोन केला आणि शिवीगाळ केली. तसेच यावेळी संबंधित व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्यावतीने बोलत असल्याचा दावा केला. त्यामुळे या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. तसेच या धमकीच्या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे”, असं तारिक खान यांनी म्हटलं आहे.

तारिक खान पुढे म्हणाले की, “मी पोलिसांना कळवलं आहे की ही अफवा असू शकते. पण फोन करणाऱ्याला ओळखणे आणि अटक करणं गरजेचं आहे. मी पोलिसांना अलीकडील संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि मागील घटना दिल्या आहेत”, असं त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी काय म्हटलं?

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (शहर) रामानंद प्रसाद यांनी याबाबतची माहिती देताना म्हटलं की, “हा कॉल खरोखर बिश्नोई टोळीचा होता की फसवणूक करणाऱ्याचा होता? हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत. कॉल करणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस उपअधीक्षक स्तरावरील एका अधिकाऱ्याला चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे.”