समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “लाल टोपी उत्तर प्रदेशसाठी ‘रेड अलर्ट’ आहे” या टीकेवरून मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. जया बच्चन यांनी मोदींवर पलटवार करत एक दिवस लाल टोपीच तुम्हाला कोर्टात खेचत तुमची जबाबदारी निश्चित करेल असं मत व्यक्त केलं.
जया बच्चन म्हणाल्या, “भाजपाच्या बुडत्या जहाजाला काय झालंय? पळून जाणारं पहिलं कोण आहे? इथं बरोबर तेच होत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीमुळे भाजपा घाबरली आहे.”
“भाजपाचा न्याय आणि निष्पक्षपातीपणावर विश्वास नाही हे लोकांना समजाऊन सांगण्यासाठी लखीमपूर केरी प्रकरण चांगली घटना आहे,” असंही जया बच्चन यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी अभिनेत्री आणि त्यांची सून ऐश्वर्या रायच्या ईडी चौकशीवर बोलण्यास नकार दिला.
मोदी काय म्हणाले होते?
दरम्यान, समाजवादी पक्षावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी यांनी कुणाचंही नाव न घेताच म्हणाले, “लाल टोपी उत्तर प्रदेशसाठी रेड अलर्ट आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे की लाल टोप्यांना केवळ लाल दिव्यांची काळजी आहे. त्यांना तुमच्या त्रासाची आणि प्रश्नांची काहीही काळजी नाही. लाल टोपीला केवळ सत्ता हवी आहे. त्यांना घोटाळे करण्यासाठी, स्वतःची तिजोरी भरण्यासाठी, अनधिकृत कामांसाठी, माफियांना स्वातंत्र्य देण्यासाठी सत्ता हवी आहे.”
हेही वाचा : “अनेक वर्षांपासून संसदेत, मात्र पहिल्यांदाच….”, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार जया बच्चन संतापल्या
“मी तुम्हाला शाप देते, लवकरच तुमचे वाईट…”
दरम्यान, राज्यसभेमध्ये ड्रग्जविरोधी विधेयकासंदर्भात चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा पारा चांगलाच चढला. विधेयकाच्या चर्चेऐवजी जया बच्चन यांनी थेट १२ निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली. “आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही सरकारकडून न्यायाची अपेक्षा करत नाही, पण तुमच्याकडून करू शकतो. तुम्ही या सभागृहाच्या किंवा बाहेर बसलेल्या १२ सदस्यांना कसं संरक्षण देत आहात?” असा सवाल त्यांनी सभापतींना केला.
दरम्यान, विधेयकावर चर्चा करत नसल्याचं सभापतींनी सांगताच “ही माझी बोलण्याची वेळ आहे. आम्हाला तीन ते चार तास फक्त एक क्लेरिकल एररवर चर्चा करण्यासाठी दिले का?” असं त्या म्हणाल्या. तसेच, विरोधी बाकांवर बसलेल्या सदस्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, “मैं आप से पूछती हूँ, आप किस के सामने बिन बजा रहे हो?”
वैयक्तिक टीका आणि जया बच्चन यांचा पारा अनावर!
याचदरम्यान भाजपा खासदार जुगल लोखंडवाला यांनी जया बच्चन यांना उद्देशून काहीतरी टिप्पणी केली. यामुळे गोंधळ अजूनच वाढला आणि जया बच्चन यांचा पारा त्याहून जास्त वाढला. “ते माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी कशी करू शकतात? ही फार वाईट बाब आहे की तुमच्यामध्ये थोडाही सेन्स नाही आणि बाहेर बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांबाबत थोडाही सन्मान नाही”, असं जया बच्चन म्हणाल्या.
यावेळी बोलताना जया बच्चन यांनी रागाच्या भरात “तुम्हा लोकांचे वाईट दिवस फार लवकर येणार आहेत, मी तुम्हाला शाप देते”, असं म्हटलं. यामुळे सभागृहातला गोंधळ अजूनच वाढला. त्यामुळे सभापतींनी लागलीच कामकाज काही काळासाठी तहकूब केलं.
“त्यांनी असं बोलायला नको होतं”
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर जया बच्चन यांनी प्रतिक्रिया देताना कुणावरही टीका करणं टाळलं. “मला कुणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही. जे काही घडलं, ते फार दुर्दैवी होतं आणि त्यांनी अशा पद्धतीने बोलायला नको होतं”, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा : जया बच्चनशी दररोज खोटं बोलतो; अमिताभ यांनी केला खुलासा
यावर लोखंडवाला यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही ड्रामा करू नका असं जेव्हा मी म्हणालो, तेव्हा संपूर्ण विरोधी पक्षांना उद्देशून मी म्हणालो होतो. नंतर मला सांगण्यात आलं की जया बच्चन सभागृहात संतापल्या आहेत. मी कुणाविरोधातही वैयक्तिक टिप्पणी केलेली नाही. मी सर्व विरोधकांकडे बघून ते म्हणालो होतो”, असं जुगल लोखंडवाला म्हणाले.