उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी करोना प्रादुर्भाव आणि देशांच्या दोन्ही किनारपट्ट्यांना धडकलेल्या चक्रीवादळांसंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे. करोना आणि चक्रीवादळांसाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचं हसन यांनी म्हटलं आहे. भाजपा सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्ती देशामध्ये आल्याचं हसन यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हसन यांनी सीएए (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि एनआरसी (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) कायद्यांच्या माध्यमातून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केलाय. मागील सात वर्षांमध्ये मोदी सरकारने केवळ धार्मिक भेदभाव निर्माण करण्यासंदर्भातील कायदे बनवले. सरकारच्या या भेदभावामुळेच महासाथ आणि दोनदा वादळं येऊन गेली आहेत. जमीनीवरील लोकांनी न्याय दिला नाही तर आसमानवाला (देव, ईश्वरी शक्ती) न्याय करतो, असंही हसन यांनी म्हटल्याचं वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे.

आणखी वाचा- दिलासादायक….सलग सातव्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा दोन लाखांच्या आत

“देशातील ९९ टक्के लोक धार्मिक आहेत. जग चालवणारा आणि जगामध्ये न्याय देणारा कोणीतरी वर आहे असं आपल्यापैकी सर्वजण मानतात. जेव्हा आकाशातील तो न्याय करतो तेव्हा त्यात जर तरची शक्यता नसते. मागील काही दिवसांमध्ये किती मृतदेहांची कशापद्धतीने हाताळणी करण्यात आली, त्यांना मृत्यूनंतरचा सन्मान नाकारण्यात आला हे आपण पाहिलं असेल. मृतदेह नदीत सोडण्यात आले. कुत्र्यांनाही मृतदेहांचे लचके तोडले. श्मशानांमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडंही उपलब्ध नव्हती,” असं हसन यांनी म्हटलं आहे. या सरकारला गरीब जनतेची चिंता नाहीय. सर्व वाटा केवळ श्रीमंतांचा आहे, असा टोलाही हसन यांनी लगावला. ज्याने श्रीमंतांना जन्म दिलाय त्यानेच गरीबांना जन्म दिलाय. तो सर्वांचा मालक आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता माझ्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात आणखीन नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागेल, अशी भीतीही हसन यांनी बोलून दाखवली आहे.

आणखी वाचा- करोनामुळे लोकप्रियता कमी झाली असली तर पुन्हा मोदीच सत्तेत येणार; मेहुल चोक्सीचा दावा

मे महिन्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा किनारपट्टीला तौते चक्रीवादळाचा तर पश्चिम बंगाल, ओडिशाला यास चक्रीवादळाचा फटका बसला होता. त्याच पार्श्वभूमीवर हसन यांनी हे वक्तव्य केलं आहे.