उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे काही आठवड्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला असून राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील भाजपा कार्यालयात उत्तर प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
पक्षातील तीन मंत्री आणि काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर भाजपाकडूनही जशास तसं उत्तर देण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. हरियाणाचे भाजपा प्रभारी अरुण यादव यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत सांगितलं होतं की, “मुलायम सिंग यादव यांचा लहान मुलगा प्रतिक याची पत्नी अपर्णा यादव उद्या भाजपात प्रवेश करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता पक्षप्रवेश होईल”.
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव भाजपासाठी तगडं आव्हान निर्माण करत आहेत. अखिलेश यादव यांना अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबाही मिळत असल्याने भाजपासाठी चिंता निर्माण झाली आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही त्यांना पाठिंबा आहे.
भाजपामधून अनेक दिग्गज नेते बाहेर पडत नसल्याने राजकीय वातावरण तापलं असतानाच अपर्णा यादव यांच्या पक्षप्रवेशाची माहिती समोर आली होती.
अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लखनऊ कँटमधून निवडणूक लढवली होती. यावेळी रिटा बहुगुणी जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. अपर्णा यादव bAware नावाची संस्था चालवतात. ही संस्था महिलांसाठी तसंच गायींना निवारा देण्याचं काम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामांचं कौतुक केल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या चर्चेत होत्या.
उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.