यूपीए सरकारने मांडलेल्या लोकपाल विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने गुरुवारी घेतला. या विधेयकावर शुक्रवारी राज्यसभेमध्ये चर्चा होणार आहे.
लोकपाल विधेयकाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी पत्रकारांना सांगितले. या विधेयकाला का विरोध करणार, याचे कारण मात्र त्यांनी दिले नाही. हे विधेयक अगोदर राज्यसभेमध्ये येऊ देत. मगच आम्ही त्याला का विरोध करीत आहोत, हे सभागृहात सांगू, असेही ते म्हणाले.
यूपीए सरकारने देशातील जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांनी कोणतेही नवीन विधेयक आणू नये, असे पक्षाचे अन्य एक नेते नरेश आगरवाल म्हणाले.
दरम्यान, संयुक्त जनता दलाने या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader