नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच ‘नासा’ या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावर पाठवलेले ‘लाडी’ हे यान ताशी ५८०० किलोमीटर वेगाने तेथील पृष्ठभागावर आदळले. द ल्युनर अॅटमॉस्फिअर अँड डस्ट इनव्हिरॉनमेंट एक्स्प्लोरर (लाडी)यानात चंद्राच्या कक्षेत फिरून वैज्ञानिक प्रयोग करण्याइतके इंधन उरले नव्हते. त्यामुळे ते गेल्या आठवडय़ातच चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने नेऊन आदळवण्याचे ठरवण्यात आले. शेवटी हे यान चंद्रावर अगदी कमी उंचीवर आले. लाडी अवकाशयान हे व्हेन्डिंग मशिनच्या आकाराचे होते व त्याचे पृष्ठभागावर आदळल्यानंतर तुकडे झाले. ते यान घर्षणामुळे तापून त्याची वाफ झाली असावी. जे अवशेष उरले ते खोल विवरात गाडले गेल्याची शक्यता आहे. लाडी प्रकल्पाचे अॅमेस येथील प्रकल्प वैज्ञानिक रिक एल्फिक यांनी सांगितले की, लाडी जेव्हा चंद्रावर कोसळले तेव्हा त्याचा वेग ताशी ३६००० मैल (५७९४ कि.मी) होता; जो रायफलच्या बंदुकीच्या तीन पट होता. ते यान विवरात पडले की सपाट भागावर पडले, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे व लाडी हे यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ एप्रिलमध्येच आणण्यात आले होते. लाडीची उंची दोन किलोमीटरपेक्षा कमी होती. पृथ्वीवर विमाने फिरतात त्यापेक्षाही कमी उंची होती.
११ एप्रिलला लाडीने मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. चंद्राच्या अतिदूरच्या भागात ते पडेल असा त्यामागचा इरादा होता. जेथे पूर्वीची याने उतरली तोच हा भाग असून पृथ्वीच्या दृष्टिपथात येत नाही. लाडी यानाने १४ व १५ एप्रिलच्या चंद्र ग्रहणापर्यंत टिकाव धरला. कमी तापमानाला टिकून राहण्याची त्याची क्षमता यातून दिसून आली. येत्या काही महिन्यात लाडी यान केव्हा कोसळेल व कुठे कोसळले याबाबत मोहीम नियंत्रक सांगू शकतील.
लाडी यान
नासाच्या व्हर्जिनियातील ‘व्ॉलॉप्स फ्लाइट फॅसिलिटी’ या केंद्रावरून सप्टेंबर २०१३ रोजी लाडी यान सोडले होते. त्याने ६ ऑक्टोबरला चंद्राभोवती प्रदक्षिणा सुरू केली व त्यानंतर १० नोव्हेंबरपासून माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. लाडी यानात द्विमार्गी संदेशवहनाची सोय होती. लेसरऐवजी रेडिओ लहरींचा वापर केलेला होता. द ल्युनर लेसर कम्युनिकेशन डेमॉनस्ट्रेशन या यंत्रणेमुळे पल्स लेसर किरणांच्या मदतीने चंद्र व पृथ्वी यांच्यातील ३८४६३३ कि.मी.चे अंतर विक्रमी काळात कापून ही माहिती दर सेकंदाला ६२२ मेगाबाइट वेगाने डाऊनलोड होत असे.