‘स्पेस एक्स’ कंपनीचे मोठे यश
अकरा उपग्रह सोडून स्पेस एक्स या कंपनीचा ‘फाल्कन’ अग्निबाण सोमवारी रात्री परत पृथ्वीवर आला आहे. एरवी उपग्रह सोडल्यानंतर अग्निबाण पुन्हा परत येत नाही, पण प्रथमच हा प्रयोग स्पेस एक्स कंपनीने यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी अग्निबाणाचे सर्व भाग तयार करण्याचा खर्च कमी होणार आहे. यात १५ मजली उंचीच्या बूस्टरचा भाग पृथ्वीवर सुरक्षित परत आला आहे.
निर्मनुष्य असलेला अग्निबाण केप कॅनव्हरॉल येथे परत उतरला आहे. कंपनीचे अधिकारी मस्क यांनी ‘वेलकम बॅक बेबी’ असा संदेश ट्विटरवर पाठवला आहे. अतिशय क्रांतिकारी असा हा क्षण आहे व आतापर्यंत बूस्टर कुणीही पृथ्वीवर सुरक्षित आणले नव्हते. अतिशय उपयोगी अशी ही मोहीम होती; केवळ सरावाचे उड्डाण नव्हते असे मस्क यांनी सांगितले.
अकरा उपग्रह सोडणारा प्रक्षेपक पृथ्वीवर आणण्यात स्पेस एक्स कंपनीने यश मिळवले आहे. या यशानंतर स्पेसएक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आनंदाने उड्या मारल्या. नऊ मिनिटांच्या उड्डाणानंतर हा प्रक्षेपक परत आला. यापूर्वीही असे प्रयत्न झाले होते, पण त्यात यश आले नव्हते. यावेळचे उड्डाणही चांगले झाले व यापुढे आणखी चांगली कामगिरी आम्ही करून दाखवू, असे मस्क यांनी सांगितले. केप कॅनव्हरॉल एअर फोर्स स्टेशनचे ब्रिगेडियर जनरल वेन मोन्टीथ यांनी सांगितले की, बूस्टर परत आले असून त्यामुळे २०१५ या वर्षांवर एक आश्चर्यकारक उद्गारचिन्ह लागले आहे. गेल्यावेळी स्पेस एक्सने स्पेस एक्स फाल्कन ९ या प्रक्षेपकाचे उड्डाण जूनमध्ये केले होते, पण तो प्रक्षेपक अध्र्यावरूनच खाली कोसळला होता. अग्निबाणाच्या वरच्या भागात बिघाड झाला होता, त्यानंतर त्यात अनेक दुरूस्त्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता फेब्रुवारीत नासा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला अग्निबाणाच्या मदतीने रसदपुरवठा करू शकणार आहे.

Story img Loader