बेंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) अवकाशात डॉकिंग प्रक्रियेचा एक प्रयत्न म्हणून दोन्ही उपग्रह एकमेकांपासून तीन मीटर अंतरावर आणले आणि नंतर सुरक्षितपणे पुन्हा त्यांच्या मूळ स्थानी हलविले. ‘इस्रो’ने रविवारी ही माहिती दिली. डेटाचे पूर्ण विश्लेषण केल्यानंतरच डॉकिंगची प्रक्रिया केली जाईल, असेही संस्थेने म्हटले आहे.
‘इस्रो’ने ‘एक्स’वर केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे, की दोन्ही उपग्रह १५ अंतरावर आणि नंतर ३ मीटर अंतरावर आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अवकाशयान पुन्हा सुरक्षित अंतरावर नेण्यात आले आहे.
हेही वाचा >>> ‘महाकुंभ’ आज पासून ; पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान; ४५ दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर
या डेटाचे पूर्ण विश्लेषण केल्यानंतरच डॉकिंग प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.
अवकाशात डॉकिंग प्रयोग करण्यास दोनदा उशीर झाला आहे. सुरुवातीला हा प्रयोग ७ जानेवारी रोजी आणि नंतर ९ जानेवारी रोजी केला जाणार होता. ३० डिसेंबर २०२४ रोजी ‘इस्रो’ने डॉकिंग प्रयोगाची घोषणा केली.
‘पीएसएलव्ही-सी ६०’ मोहिमेमध्ये प्रत्येकी २२० किलो वजनाचे दोन स्पाडेक्स उपग्रह (एसडीएक्स ०१ आणि एसडीएक्स ०२) वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले आहेत. या मोहिमेत संशोधन आणि विकासासाठी आणखी २४ ‘पे-लोड’ आहेत. स्पाडेक्स मोहीम यशस्वी झाली, तर भारत असा प्रयोग करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. ही मोहीम यशस्वी झाली, तर पुढील अनेक मोहिमांसाठी त्याचा फायदा होणार आहे.