आंध्र प्रदेशच्या प्रस्तावित विभाजनाबाबत केंद्रीय नेत्यांची वक्तव्ये परस्परविरोधी असल्याने मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी संतप्त झाल्याचे वृत्त असून, त्यांनी केंद्रीय नेत्यांना या संवेदनक्षम प्रश्नाबाबत एकच सूर आळविण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी एखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या प्रश्नाबाबत निश्चित कोणती पद्धत अवलंबिली जात आहे, असा सवाल केला. आपण एक विधान करता आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे दुसरेच विधान करतात. अशा परस्परविरोधी विधानांमुळे राज्यातील जनतेच्या मानात गंभीर शंका निर्माण होत आहेत, असे रेड्डी यांनी दिग्विजय सिंग यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय नेत्यांनी अशा प्रकारची परस्परविरोधी वक्तव्ये केली, तर विभाजनाबाबत विविध प्रांतातील जनतेमध्ये तुम्ही कसा  विश्वास निर्माण करणार, त्यामुळे सर्व नेत्यांनी या प्रश्नाबाबत एकच सूर आळवावा, असेही रेड्डी यांनी दिग्विजय सिंग यांना सांगितल्याचे कळते.
अशा प्रकारची विरोधी वक्तव्ये राज्याच्या दोन प्रांतांसाठी योग्य नाहीत, असेही रेड्डी यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाद्वारे प्रसृत केलेल्या एका निवेदनात स्पष्ट केले.