संसदेचे पावसाळी अधिवेशन गेल्या आठवड्यात सुरू झाल्यापासून विरोधकांची घोषणाबाजी आणि राजीनाम्याच्या मागण्यांवरून काहीही कामकाज न झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभेचे कामकाज सुरळीतपणे सुरू व्हावे, यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री निधन झाल्यानंतर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले. गुरुवारी पुन्हा कामकाज सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे.
२१ जुलैला संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, आयपीएल घोटाळ्यातील आरोपी ललित मोदी यांना मदत केल्याच्या मुद्दयावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली आहे. याच मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. याबरोबरच मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा आणि त्यावरून झालेल्या गूढ मृत्यूंच्या मालिकेवरूनही विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या सर्वच मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक असून, चर्चा करण्याआधी संबंधितांचे राजीनामे घेण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. राजीनाम घेत नाही, तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे. या मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, राजीनामे नाही, तोपर्यंत चर्चा नाही, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा