चीनमधील सिचुआन प्रांतातील संशोधन
प्राणी मुके असतात पण तरी त्यांची आवाजाची वेगळी भाषा असते ती समजली तर त्यांचे सगळे विस्मयकारक जग आपल्यापुढे खुले होऊ शकते. अलीकडेच चीनमध्ये आढळून येणाऱ्या पांडा या प्राण्याची भाषा उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आले असून त्यामुळे एरवी बाहेरच्या जगापासून अलिप्त असलेल्या या प्राण्यांच्या खासगी जीवनावर त्यामुळे प्रकाश पडणार आहे.
द चायना कन्झर्वेशन अँड रीसर्च सेंटर फॉर द जायंट पांडा या चीनच्या सिचुआन प्रांतातील संस्थेने २०१० पासून पांडा भाषा प्रकल्प राबवला होता. त्यांनी प्रथम पांडा या प्राण्याच्या प्रजनन केंद्रात जाऊन ध्वनिमुद्रण केले होते त्यात त्यांचे बछडे व प्रौढ पांडांचे आवाज होते.

अन्न सेवन, मीलन, सुश्रुषा, भांडण व इतर प्रसंगात त्यांचे आवाज टिपण्यात आले व त्यावरून त्यांच्या भाषेचा अर्थ लावण्यात आला असे या संस्थेचे प्रमुख झांग हेमिन यांनी सांगितले. पांडांचे आवाज व कृती यांचेही ध्वनिमुद्रण करण्यात आले आहेत. पांडांच्या भाषेचा उलगडा आम्ही केला आहे व ती अतिशय आश्चर्यकारक भाषा आहे असे सांगून झांग म्हणाले की, पांडाचे बछडे बोलू शकत नाहीत पण ते गी-गी असा आवाज काढतात तेव्हा भूक लागल्याचे सांगत असतात, वॉ-वॉ असा आवाज करतात तेव्हा आपण दु:खी आहोत असे सांगत असतात. कू-कू असा आवाज करतात तेव्हा सुखात असल्याचे सांगतात. प्रौढ पांडा हे मातेकडून भाषा शिकतात. गर्जना, भुंकण्यासाखा आवाज, ओरडणे, चित्कारणे यासारख्या आविष्कारातून ते संदेश देत असतात. पांडाची आई पक्ष्याप्रमाणे आवाज काढत असेल तर ती बछडय़ांवर चिडली आहे असे समजावे. जर ती जोराने भुंकण्याचा आवाज काढत असेल तर कुणीतरी अनाहुत जवळ आला आहे असे समजावे. तसेच येथून चालते व्हा असा संदेश त्या अनाहुताला त्या देत असतात. पांडा हे प्रेमात असतात तेव्हा कोकराप्रमाणे नम्र असतात. नर पांडा बा असा आवाज काढतात तेव्हा ते प्रणयाराधन करीत असतात. मादी पांडा त्याला पक्ष्यासारखा आवाज काढून प्रतिसाद देतात. आम्ही संशोधन केले तेव्हा आम्हाला पांडा, पक्षी, कुत्रा व मेंढी यापैकी कुणाचे संशोधन करीत आहोत असा प्रश्न पडला असे झांग यांनी पांडांच्या वैविध्याचे वर्णन करताना सांगितले. आता या केंद्रात पुढे संशोधन चालू ठेवले जाणार असून आवाज ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाने पांडाच्या प्रतिसादांचे भाषिक रूप तयार केले जाणार
आहे. पांडांची भाषा समजली तर त्यांचे रक्षण करणे सोपे जाणार आहे. सध्या जंगली स्वरूपाचे केवळ दोन हजार पांडा प्राणी उरले आहेत. ते शिचुआन व शांक्झी प्रांतात आहेत. त्यात ३७५ मोठे पांडा असून २०१३ पर्यंत २०० पांडांना या केंद्रात ठेवून त्यांच्या आवाजावरून भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.