Special 26 Style Heist In Uttar Pradesh : बॉलिवूड चित्रपट स्पेशल २६ मध्ये जसे काही लोक बनावट अधिकाऱ्यांची टोळी बनून व्यापाऱ्यांना लुटतात त्याच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातून समोर आली आहे. बिजनोर जिल्ह्यातील अफझलगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनियावाला गावात चार जणांनी पोलीस असल्याचे भासवत एका मांस व्यापाऱ्याच्या घरात घुसून, बंदुकीचा धाक दाखवत कुटुंबाला ओलीस ठेवले आणि १.५ लाख रुपये रोख आणि २ लाख रुपयांचे दागिने लुटले. दरम्यान या कुटुंबाच्या तक्रारीनंतर फरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील पीडित व्यापारी मौलाना फुरकान यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुरुवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास या बनावट पोलिसांनी घरात प्रवेश केला. आम्ही २५ जानेवारी रोजी होणाऱ्या त्यांच्या दोन बहिणींच्या लग्नाच्या समारंभासाठी घरात रोख रक्कम आणि दागिने ठेवण्यात आले होते. त्याचावरच या चार बनावट पोलिसांनी डल्ला मारला.”
पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी
या घटनेची माहिती मिळताच बिजनोरचे पोलीस अधिक्षक अभिषेक झा आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक धर्मसिंग मार्चल यांनी या प्रकरणाच्या तपासणीसाठी घटनास्थळी धाव घेतली. हे प्रकरण पाहून संतापलेल्या पोलीस अधिक्षकांनी अफझलगड पोलीस ठाण्याचे प्रमुख योगेश चौधरी हटवले असून, त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक सुमित राठी यांना अफजलगड पोलिस ठाण्याची सूत्रे दिली आहेत.
मध्यरात्री नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री मनियावाला गावातील फुरकान कुरेशी घरी झोपले होते. आई, आजी आणि बहिणी दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री २ च्या सुमारास चार दरोडेखोर पोलीस असल्याचे भासवत पासपोर्ट तपासायचे आहेत म्हणत, घरात घुसले होते. यावेळी तिघांकडे पिस्तूल होते तर चौथ्याकडे चाकू होता.
डोक्यावर रोखली पिस्तूल
दरोडेखोरांनी फुरकान कुरेशी यांच्या डोक्यावर पिस्तूल रोखली आणि घरातील रोख रक्कम आणि दागिने मागितले. पुढे या दरोडेखोरांनी कुरेशी यांच्या आईवरही पिस्तूल रोखले, त्यामुळे त्या कपाटाची चावी घेऊन आल्या आणि दरडेखोरांना दिली. त्यानंतर या दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिने लुटले.