२३ मे रोजीचा लोकसभा निवडणुकीचा निकाल हा विरोधकांना फक्त धोबीपछाड देणारा नाही तर थेट आस्मान दाखवणारा होता. विरोधकांचा इतक्या वाईट पद्धतीने सुपडा साफ होईल असा अंदाज प्रसारमाध्यमांनीच भल्या भल्या दिग्गजांनी आणि ‘जाणत्या’ राजकारण्यांपैकी कुणीही बांधला नव्हता. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न, राफेल करार या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांनी विशेषत: काँग्रेसने देशात हवा निर्माण केली होती. हेच धोरण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्रात राबवले. ज्यानंतर इथपर्यंत चर्चा रंगल्या मोदींना आणि पर्यायाने भाजपाला २४० ते २६० पर्यंत जागा मिळतील. लोकसभा निवडणूक निकाल हे त्रिशंकू पद्धतीचे लागतील असंही म्हटलं गेलं. परिवर्तन होणारच हा नाराही दिला गेला. मात्र हे सगळे अंदाज खोटे ठरवत भाजपाने बाजी मारली. मोदींचा अश्वमेध कुणीही रोखू शकलं नाही. एग्झिट पोलचे आकडे समोर आले तेव्हाही विरोधक म्हणत होते की हा भ्रमाचा भोपळा आहे. नुसत्या एग्झिट पोलच्या आकड्यांवर खुश होण्याची गरज नाही. मात्र निकालानंतर एक्झिट पोलचे आकडे किमान बरे होते असंही म्हणायची वेळ विरोधकांवर आली. नाचक्की किंवा नाक कापणं काय असतं ते या देशातल्या सर्वात मोठ्या आणि जुन्या पक्षाने अर्थात काँग्रेसने अनुभवलं.
मागच्या पाच वर्षात राम मंदिर, गोहत्या, गोरक्षा, गोरक्षेच्या नावाखाली झालेला हिंसाचार, रोहित वेमुला प्रकरण, राफेल करार, नोटाबंदी हे असे अनेक विषय घेऊन विरोधकांनी वारंवार मोदींना घेरण्याचा आणि त्यांच्यावर तुटून पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र मतपेटीत मतदारराजाने मतांचं दान दिलंं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच. इंदिरा गांधी सरकारने नसबंदीचा निर्णय घेतला होता त्यावेळी जनतेने त्यांना नाकारलं, आता नोटाबंदीच्या निर्णयानंतरही याचीच पुनरावृत्ती होईल असंही म्हटलं गेलं होतं. मात्र तसं झालं नाही. राफेल करारावरून जी बोंब काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी उठवली होती. ती शिमग्याच्या बोंबांप्रमाणेच ठरली.
इकडे महाराष्ट्रातही तसंच घडलं. भाजपा लहान भाऊ म्हणत शिवसेनेने त्यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न केला. जावा-जावा आणि उभा दावा अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. त्याप्रमाणेच आम्ही मोठा भाऊ, आम्ही मोठा भाऊ ही ओरड उद्धव ठाकरे, संजय राऊत करत राहिले. मात्र राज्यातही आम्हीच मोठे भाऊ आहोत हे भाजपाने लोकसभेच्या विजयानंतर सिद्ध केलं. विजयासाठी राज्यात एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती झाली. ही या दोन्ही पक्षांची अपरिहार्यता होती, मात्र शिवसेनेला जे वाटलं होतं की सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला आपली मदत लागेलच ते काही खरं ठरलं नाही. शिवसेनेचे ते मनसुबे धुळीला मिळाले.
विरोधकांकडे इतके सगळे मुद्दे होते तरीही मोदींचा विजय का झाला? यावर नजर टाकली तर लक्षात येतं की मोदींनी पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट या ठिकाणी जो एअरस्ट्राईक केला आणि त्यानंतर देशभक्तीने ओतप्रोत भरलेली जी भाषणं केली त्या सगळ्याचं रूपांतर विजयात झालं. मतदारांवर कमालीचा परिणाम करणारी ही भाषणं ठरली. फक्त पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईक हे एकच कारण विजयासाठी कारणीभूत नाही तर इतर अनेक कारणं आहेत जी या विजयात हातभार लावत गेली. ‘मी खालच्या जातीचा आहे म्हणून माझ्यावर टीका होते आहे’ असे मोदींचे म्हणणे असो, प्रत्येक भाषणात भावनिक आवाहनानंतर वाचलेला विकासाचा पाढा असो, प्रत्येकाला २०२२ पर्यंत पक्कं घर, जनधन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना या सगळ्या गोष्टी त्यांनी भाषणातून अत्यंत सुयोग्य पद्धतीने रूजवल्या. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मुद्देही होते मात्र या सगळ्यापुढे देशभक्तीची ढाल घेऊन मोदी उभे राहिले आणि विरोधकांचे सगळे हल्ले, सगळे आरोप त्यांनी निष्प्रभ ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतकंच विजयाइतकंच श्रेय जातं ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही.
अमित शाह यांनी ज्याप्रकारे राजकारण आणि आकड्यांची गणितं मांडली आणि ती ज्याप्रकारे घडवून आणली त्यातही या विजयाचं गमक आहे. अब की बार तीनसौ पार ही घोषणा देण्यामागेही अमित शाह यांचं खास धोरणच होतं. पडद्यामागे घडलेल्या आघाड्या, तडजोडी या सगळ्याही या विजयासाठी तेवढ्याच कारणीभूत आहेत. खास करून पश्चिम बंगालमध्ये त्यांनी केलेली भाषणं ही मतांवर किती प्रभाव पाडणारी ठरली हे देखील निकालाच्या दिवसाने दाखवून दिलं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, सपा, बसपा, राजद या सगळ्यांनी भाजपाविरोधात आणि मोदी निवडून येऊ नयेत यासाठी पुरेपूर प्रयत्न केले मात्र त्या सगळ्यांना अपयशी ठरवत आणि दे धक्का देत मोदींनी बाजी मारली. देशाच्या राजकारणातले ‘बाहुबली’ आपणच आहोत हे मोदींनी दाखवून दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अचूक टायमिंग आणि त्याला लाभलेली अमित शाह यांची परफेक्ट साथ या दोन्ही गोष्टी या निवडणुकीच्या दृष्टीने आणि निकालाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. जसा देशात या दोघांचा करीश्मा दिसला तसा महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही करीश्मा दिसला. महाराष्ट्रात काँग्रेसची अवघी एक जागा आली आणि राष्ट्रवादीच्या चार जागा मिळाल्या. शिवसेना भाजपा युतीला ४१ जागा मिळण्यामागे सगळं श्रेय जातं ते मुख्यमंत्र्यांना. कारण योग्यवेळी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्यासमोर मोठं आव्हान होतं ते राष्ट्रवादीचं, सुजय विखे पाटील यांना अहमदनगरचं तिकिट दिल्याने काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याला त्यांनी राजकीयदृष्ट्या खिशातच घातलं. राज ठाकरे यांच्या सभांचा मोठा परिणाम होईल असं बोललं जात होतं. मात्र त्यावर मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखती दरम्यान दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली. ते म्हटले होते की राज ठाकरेंना ऐकणारा मतदार हा पूर्वापार युतीला मतदान करणारा आहे. ते काय सांगत आहेत यापेक्षा आपल्याला काय पटतं तेच मतदार करतील आणि घडलंही तसंच. त्यामुळे महाराष्ट्रात मिळालेल्या भाजपाच्या २३ जागांचे शिल्पकार ठरले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राज ठाकरेंना हा निकाल अनाकलनीय वाटतो हे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतच स्पष्ट केलं. मात्र मोदीविरोध केला काय किंवा मोदींना पाठिंबा दिला काय (२०१४ ची भूमिका) त्याचं रूपांतर मतांमध्ये परिवर्तित करता येत नाही हे त्यांना शिकवणारा हा निकाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
खरंतर साक्षी महाराज, साध्वी प्रज्ञा, कैलाश विजयवर्गीय, गिरीराज सिंग, बिपल्ब देब, संबित पात्रा या सगळ्या वाचाळवीरांनी मोदींना अडचणीत आणलं की काय अशीही चर्चा चांगलीच रंगली होती. साध्वी प्रज्ञा ठाकूरने आधी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर नथुराम गोडसेला देशभक्त म्हटलं. नंतर दिलगिरी व्यक्त केली तरीही ही आणि अशी वक्तव्यं मोदींना भोवतील असं वाटलं होतं. मात्र तसं न होता या सगळ्याचा त्यांना फायदाच झाला. काँग्रेसचे वाचाळवीर म्हणजेच दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आणि सॅम पित्रोडा यांनी केलेली वक्तव्यं भाजपाच्या पथ्यावर पडली. खासकरून सॅम पित्रोडा यांनी पंजाब दंगलीबाबत केलेलं हुवा तो हुवा हे जे वक्तव्य होतं त्याचा खरपूस समाचार मोदी आणि अमित शाह यांनी घेतला. ज्याचं रूपांतर मतांमध्ये होण्यास मदत झाली.
काँग्रेसने प्रियंका गांधी नावाचं अस्त्रही यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र राजकारणात यायला थोडा उशीरच झाला अशी कबुली देत आपण अजून फारसे राजकारणाला सरावलेलो नाही हेच त्यांनी दाखवून दिलं. आपल्या भावाच्या म्हणजेच राहुल गांधी यांच्या मदतीला त्या (प्रियंका) धावून येतील असं वाटलं होतं. मात्र निवडणुकीच्या रणांगणांत लढण्याआधीच त्यांनी शस्त्र म्यान केली. याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे काँग्रेस पक्षाचं धोरण. काँग्रेसचं प्रियंका गांधी यांना राजकारणात आणण्याचं टायमिंग तर चुकलंच शिवाय त्यांनी काय करणं अपेक्षित आहे याबाबतही काँग्रेसमध्ये संभ्रमच बघायला मिळाला. राहुल गांधी यांचा परफॉर्मन्स सुधारलेला बघायला मिळाला असला तरीही तो मोदींना हरवण्यासाठी पुरेसा नाही आणि ते पंतप्रधानपदाचा चेहरा नाही हे देशातल्या मतदारांनी दाखवून दिलं. मोदी लाट नाही, मोदी लाट नाही असं म्हणणारे विरोधक अभूतपूर्व निकालाच्या त्सुनामीत वाहून गेले आहेत. आता पुढची स्वप्नं पाहण्यासाठी काँग्रेससह तमाम विरोधकांना २०२४ ची वाट बघावी लागणार आहे हे नक्की!
समीर जावळे
sameer.jawale@gmail.com