आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मुळात कापल्या गेलेल्या आयकराच्या रकमेचा सरकारकडे भरणा न केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाच्या विशेष न्यायालयाने किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांना समन्स जारी केले आहे. याप्रकरणी आयकर विभागाने मल्ल्या यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.
सन २००९-२०१० या आर्थिक वर्षांत मल्ल्या यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकरापोटी कापून घेण्यात आलेली ७४.९४  कोटी रुपयांची रक्कम आणि सदर रक्कम  विशिष्ट मुदतीत न भरल्याबद्दल ठोठावण्यात आलेला २३.७० कोटी रुपयांचा दंडही न भरल्याप्रकरणी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी कलम २७६ (ब) आणि २७८ (ब) अन्वये दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेत न्यायालयाने मल्ल्या यांना समन्स जारी केले. २७६ (ब)अन्वये आर्थिक गुन्हा सिद्ध झाल्यास किमान तीन महिने ते कमाल सात वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. या समन्समुळे मल्ल्या यांच्यासमोर नवीन डोकेदुखी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १९ एप्रिल रोजी होणार आहे.

Story img Loader