पीटीआय, जम्मू
जम्मू येथे विशेष कमांडोंच्या दहशतवादविरोधी मोहिमेत सोमवारी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांनी सोमवारी सकाळी लष्कराच्या ताफ्यावर अखनूर विभागात गोळीबार केला. सुदैवाने, यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. तीन दहशतवादी भारतात घुसल्याचा संशय असून, विशेष कमांडोंची दहशतवाद्यांविरोधात मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लष्कराच्या जम्मू येथील ‘व्हाइट नाइट कोअर’ने एका दहशतवाद्याला मारल्याची माहिती दिली. या दहशतवाद्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लष्कराच्या ताफ्यावर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात सर्वाधिक गोळ्या लष्कराच्या रुग्णवाहिकेला लागल्या. लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याच्या शक्यतेवरून दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. दहशतवादी कुठे लपले आहेत, हे नंतर शोधण्यात आले.

हेही वाचा : ‘सी-२९५’ प्रकल्प नव्या भारताचे प्रतिबिंब! मोदी, सांचेझ यांच्या हस्ते ‘टाटाएअरबस’च्या कारखान्याचे उद्घाटन

लष्कराचे विशेष कमांडो आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) कमांडोंनी दहशतवादविरोधी कारवाई केली. दुपारी पावणेतीनपर्यंत गोळीबार आणि स्फोटांचा मोठा आवाज येत होता. हेलिकॉप्टरही टेहळणीसाठी वापरण्यात आले.

हेही वाचा : जनगणना पुढील वर्षी; पुढील लोकसभा निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घेण्याचा विचार

घेराबंदी, शोधमोहीम

सोमवारी सकाळी आसन सुंदरबनी क्षेत्राजवळ दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. या भागात एपीसी ‘सारथ’ म्हणून ओळखली जाणारी ‘बीएमपी-२’ लढाऊ वाहने तैनात केली आहेत. सुरक्षा दलांनी या परिसरात घेराबंदी आणि दहशतवाद्यांची शोध मोहीम चालवली आहे. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू आहे, असे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. तर लष्कराच्या जवानांनी वेगाने प्रत्युत्तर दिल्याने हल्ल्याचा प्रयत्न असफल झाल्याचे ‘व्हाईट नाइट कोअर’तर्फे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special forces operation one terrorist killed in jammu css