देशभरात करोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देखील आता विशेष पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्राकडून आठ राज्यांना विशेष निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्राने आठ राज्यांना तयारी बळकट करण्यास आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड यांना पत्र लिहून कोविड-19 चाचण्या वाढवण्याचा, रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करण्याचा, लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता केंद्राने या राज्यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मृत्यूदर वाढू नये यासाठी केंद्राने कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. केंद्राने या राज्यांना सांगितले की, दिल्लीत लागू करण्यात आलेले GRAP मॉडेल संपूर्ण देशात नेण्याचा विचार केला जात आहे.

कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे संसर्गाचा वेग वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. यामध्ये २६३ रुग्णांसह दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे, तर २५२ रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.