भारतीय बँकांची तब्बल ९००० कोटींची कर्जे बुडवून परदेशात पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या याला मंगळवारी फरारी म्हणून घोषित करण्यात आले. अंमलबजावणी संचलनलयाने (ईडी) यापूर्वीच मल्ल्यांना फरारी म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. मल्ल्या यांना फरारी घोषित केल्यानंतर इंग्लंडकडून त्यांचे हस्तांतरण करणे शक्य होईल, असा दावा ‘ईडी’ने केला होता. अखेर आज मुंबईतील विशेष न्यायालयाने कलम ८२ अंतर्गत मल्ल्याला फरार म्हणून घोषित केले.
विजय मल्याची १,४११ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त
मागील आठवड्यातच आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्ल्या याची मुंबई आणि बंगळुरू येथील १,४११ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी जप्त केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याप्रकरणी ‘ईडी’ ही कारवाई केली होती. या मालमत्तेत मल्याचे ३४ कोटी रुपयांची बँकेतील रोख रक्कम, मुंबई आणि बंगळुरू येथील घरे अनुक्रमे १३०० आणि २२९१ चौरस फुटाची घरे, चेन्नई येथील ४.५ एकरचा औद्योगिक भूखंड, कूर्ग येथील २८.७५ एकरवरील कॉफीची बागायत, युबी सिटी आणि बंगळुरू येथील निवासी तसेच औद्योगिक बांधकामे आदींचा समावेश आहे. विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवणारा मल्ल्या कारवाईच्या भीतीने २ मार्च रोजी भारत सोडून पळून गेला आहे.

Story img Loader