आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. तर उद्यापासून नव्या संसद भवनात कामकाज सुरु होणार आहे. त्याआधी लोकसभे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारत जी २० परिषदेमुळे कसा जगभरात चर्चिला गेला हे सांगितलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण करत आज आपल्या देशासाठी ऐतिहासिक क्षण आला असल्याचं म्हटलं आहे.
जुन्या संसद भवनाचा इतिहास आपण विसरणार नाही
नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी आपण ७५ वर्षांचा देशाचा प्रेरक प्रवास आठवत आहोत. आज पुढे जाण्याचा आपला क्षण आहे. आज आपण या ऐतिहासिक संसद भवनाचा निरोप घेत आहोत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हे सदन इंपिरियल लेजिस्ट्रेटिव्ह कौन्सिल होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसद भवन अशी ओळख या इमारतीला मिळाली. इमारत जरी ब्रिटिशांनी बांधली असली तरीही या इमारतीच्या उभारणीसाठी आपल्या देशवासीयांनी घाम गाळला आहे. निधीही खर्च केला आहे असं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
संसद भवन ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेली वास्तू
मागच्या ७५ वर्षांच्या कालावधीत अनेक लोकशाही प्रक्रिया आपण या सदनात पाहिल्या. ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. आपण आता नव्या संसदेत कामकाज सुरु करणार आहोत. मात्र हे संसद भवन येणाऱ्या पिढ्यांना इतिहास सांगत राहणार आहे. भारताच्या इतिहासाचा सुवर्ण अध्याय काय होता त्याची ओळख जगाला केली जाणार आहे. अमृतकाळात आपण आता नवी स्वप्नं, नवी उर्जा, नव्या संकल्पना घेऊन पुढे जात आहोत. आज जगात भारताची चर्चा होते आणि आपल्याला त्याचा गौरव आहे. आपल्या ७५ वर्षीय संसदीय इतिहासाचा हा सामूहिक परिणाम आहे. त्यामुळेच भारताचा डंका जगात वाजतो आहे.
चांद्रयान ३ मुळे भारताचं सामर्थ्य जगाला समजलं
चांद्रयान ३ चं जे यश आपल्या देशाला मिळालं, त्यामुळे भारताच्या सामर्थ्याचं आधुनिकता, तंत्रज्ञानाशी आणि वैज्ञानिकांच्या सामर्थ्यांशी जोडलेलं नवं रुप जगासमोर आलं आहे. याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. मी आज देशातल्या संशोधकांचे कोटी कोटी धन्यवाद देतो आणि चांद्रयान ३ साठी त्यांचं अभिनंदन करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
जी २० चं यश हे १४० कोटी भारतीयांचं यश आहे.
जी २० ला आपल्या देशात यश मिळालं. त्यामुळे देशाचा गौरव वाढला. १४० कोटी भारतीयांचं हे यश आहे, हे माझं किंवा पक्षाचं यश नाही. भारतात ६० ठिकाणी जी २० परिषद पार पडली, देशातल्या राज्यातील विविध सरकारांनी ही परिषद घेतली ही बाब गौरवास्पाद आहे. भारताकडे जेव्हा या परिषदेचं अध्यक्षपद असताना अफ्रिकन युनियन सदस्य झाला. मी तो भावनिक क्षण कधीही विसरु शकत नाही. किती मोठ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आपल्या भाग्यात लिहिला गेला आहे ही बाबही अभिमानास्पद आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.