आपल्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे सातत्याने वादात सापडणारे अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात एका तरुणीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. जोधपूरमधील आश्रमात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप संबंधित मुलींनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.
मध्य दिल्लीतील कमला मार्केट पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. जोधपूरमधील आश्रमात पूजाविधी करण्यासाठी आपल्याला बोलावण्यात आले होते. तिथेच आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे मुलीने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे आसाराम बापू सतत चर्चेत असतात. गेल्यावर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये झालेल्या सामुहिक बलात्काराला संबंधित पीडित तरुणीही जबाबदार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. उन्हाळ्यात महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती असताना नवी मुंबई, नागपूरमध्ये त्यांनी भक्तांवर पाण्याचे जोरदार फवारे मारून होळी साजरी केली होती. त्यांच्या या कृतीवरही सर्वच स्तरांतून टीका झाली होती.

Story img Loader