सुहास धुरी, लोकसत्ता
मांडू (मध्य प्रदेश) : प्राचीन संस्कृती, इतिहास आणि परंपरा देशातील प्रत्येक राज्याला लाभली आहे. मध्य प्रदेशही त्याला अपवाद नाही. माळव्यातील धार जिल्ह्यातील मांडू महोत्सवात त्याची प्रचीती आली. पाच दिवसांच्या महोत्सवाला महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांतील पर्यटकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक मनोरंजनासह खोलवर दडलेल्या इतिहास, कला-संस्कृतीचा मांडवच जणू या महोत्सवात उभारण्यात आला होता.
मांडू महोत्सवाचे उद्घाटन राज्याच्या पर्यटनमंत्री उषा बाबुसिंह ठाकूर यांच्या हस्ते झाले. सरत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत (३० डिसेंबर २१ ते ३ जानेवारी ) असा योग या महोत्सवातून जुळवून आणण्यात आला. हॉट एअर बलून, सायकिलग टूर, हेरिटेज आणि मांडू इंस्टाग्राम टूर, तंबूत राहण्याचा अनुभव, कला आणि शिल्पकला, संगीत-नृत्य, खाद्यविक्री, ग्रामीण भागातील जनजीवन, साहसी खेळ, ऐतिहासिक स्थळांवर फेरफटका आदींची रेलचेल या महोत्सवात होती. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती, कलाकृती आणि विविध वस्तू विक्रीची दालने येथे उभारण्यात आली होती. ‘खोजने मे खो जाओ’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात इतिहास, निसर्गसौंदर्य, आदिवासी संस्कृती याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने पर्यटक त्यात हरवून गेले होते. समुद्रसपाटीपासून ६३४ मीटर उंचीवर आणि १०९ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या एका पठारावर वसलेल्या मांडू शहरांत रात्रीच्या हुडहुडी भरणाऱ्या थंडीत पर्यटक कार्यक्रमाचा आनंद मनमुरादपणे घेत होते. कार्यक्रम विविध ठिकाणी असल्यामुळे निसर्गाचा आनंद घेत कार्यक्रम अनुभवता आला.
रेवा कुंडावर आयोजित माँ नर्मदेच्या आरतीने परिसर मंत्रमुग्ध झाला होता. वान्या फॅशन शोद्वारे आदिवासी आणि आधुनिक कलाकृतींचे सादरीकरण, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नवराज हंस, मृगया बँड आणि प्रेम जोशुआचा संगीत क्षेत्रातील सादर केलेला रंगतदार कार्यक्रम हे महोत्सवातील आकर्षण होते. जिल्ह्यातील स्थानिक गायिका इशिका मुखती आणि आंचल सचन, कृष्णा माळीवाड, कैलास यांनी लोकनृत्य तसेच आनंदी लाल यांचे संगीत या कार्यक्रमांना पर्यटकांची विशेष दाद मिळाली. डायनासोर पार्कमध्ये तारे बघण्याचा आनंद, योगाभ्यास, ग्रामीण पर्यटन सहल तसेच विणकरांना वस्त्रे विणताना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळाली. ४०० ते ६०० चौरस फुटांचे ६५ तंबू येथे उभारले होते. शामियानासारखे ऐतिहासिक बाह्यरूप आणि अंतर्गत फ्लॅट संस्कृतीतील निवास व्यवस्थेने पर्यटकही खूश झाले होते. मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने याचे नियोजन केले होते. ई फॅक्टरकडे कार्यक्रमाचे व्यवस्थापन होते.
मांडूचा इतिहास
मांडूची स्थापना सहाव्या शतकात झाली असे म्हटले जाते. आठव्या ते तेराव्या शतकांत हा भाग परमार वंशीयांच्या साम्राज्याखाली होता. त्या काळातच येथे कलेचा व साहित्याचा उत्कर्ष झाला. सोळाव्या शतकापर्यंत मांडूवर खिलजी, लोधी व घोरी यांच्या राजवटी होऊन गेल्या. मांडू हे शहर मांडवगड या नावानेही ओळखले जाते. तसा ऐतिहासिक उल्लेखांमध्ये मंडपदुर्ग, मंडपाचल, मंडपगिरी, मंडपाद्री, मंडपशैल व शदीबाद असाही नामोल्लेख आढळतो. सोळाव्या शतकात बाझ बहादूर आणि राणी रूपमती यांची प्रणयकथा आजही येथे लोकगीतांतून ऐकावयास मिळते. ३५०० फूट उंचीवर बांधलेला राणी रूपमतीचा महाल राजा बाझ बहादूर आणि राणी रूपमती यांच्या प्रेमाचा साक्षीदार आहे. महालापासून दोन किलोमीटरवर असलेले रेवा कुंड हे बाज बहादूर आणि रूपमती यांच्या प्रेमकथांना समर्पित असलेले एक स्मारक येथे आहे. ‘जहाज महाल’ व ‘हिंदूोला महाल’ या प्रसिद्ध वास्तू आहेत. हिंदूोला महाल हा डोलत असल्याचा भास होतो. ‘अशर्फी महल’ हा राजप्रासादांचा एक समूह आहे. ‘हप्त मंझील’ होशंगचा वारस महमूद याने राजा कुंभावर मिळविलेल्या विजयाचे स्मारक म्हणून उभारली आहे.
अशर्फी महलाच्या अगदी समोर जामी मशीद आहे. मलिक मुघिस की मशीदही खूपच प्राचीन आहे. हत्ती, घोडे, उंटांसाठी हाथी महाल, जन्माला आलेल्या बाळांचा सांभाळ करण्यासाठी दाईका महल आणि दाई का छोटी बहन का महल जवळजवळ आहेत. ५६ महाल हे प्राचीन वस्तुसंग्रहालय येथे आहे.
जगप्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील मांडू शहराला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक स्तरही उंचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येथील पडझड झालेल्या प्राचीन वास्तूंची डागडुजी, त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरू आहे,
असे मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक युवराज पडोले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणारे ई फॅक्टरचे जय ठाकोर यांनी सांगितले की, शहराचे वैभव पर्यटकांसाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने येथील आदिवासींचा आर्थिक विकास व्हावा यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहिला आहे.