केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना करोनाची लागण झाली आहे. रिजिजू यांनी शनिवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. “करोनाची पुन्हा तपासणी झाल्यानंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाइन व्हावे आणि स्वतःची चाचणी करावी. मला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत आहे”, असे रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.

 

शुक्रवारी टिहरी येथे ‘वॉटर स्पोर्ट्स अँड अॅडवेंचर इंन्स्टिट्यूट’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी रिजिजू उत्तराखंडमध्ये गेले होते. उद्घाटन सोहळ्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावतही त्यांच्यासमवेत होते. रावतही नुकतेच करोनातून सावरले आहेत.

गुरुवारी रिजिजूंनी उत्तरकाशी जिल्ह्यातील निलोंग व्हॅली प्रदेशला भेट दिली. यात इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) महासंचालक सुरजितसिंग देसवाल हे देखील त्यांच्यासमवेत होते.

खेळांव्यतिरिक्त, रिजिजू यांना अलीकडेच आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथीचा (आयुष) अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता, कारण या पदावरील श्रीपाद येसो नायक यांना अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुणाचल प्रदेशच्या अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार रिजिजू अल्पसंख्याक कार्यमंत्री देखील आहेत.

Story img Loader