भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायची दाखवलेली तयारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) आयसीसीने जावई गुरुनाथ मैयप्पन यांच्याबद्दल केलेले भाष्य पाहून अखेर अध्यक्ष श्रीनिवासन यांनी रविवारी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पदत्याग करणार असल्याचे सूतोवाच केले आहे. पण त्यासाठी त्यांनी तीन मागण्या ठेवल्या असून त्या पूर्ण झाल्यावर आपण राजीनामा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत श्रीनिवासन यांची डोकेदुखी वाढवली आहे.
पदत्याग करतानाही श्रीनिवासन यांनी आपली हटवादी भूमिका सोडली नसून त्यांनी तीन मागण्या कार्यकारिणी समितीपुढे ठेवल्या आहेत. मी जर निर्दोष असेन तर माझी पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात यावी, ही त्यांची पहिली मागणी असून राजीनामा दिलेल्या संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांना पुन्हा समितीमध्ये घेण्यात येऊ नये, अशी त्यांनी दुसरी मागणी केली आहे. त्याचबरोबर माझ्या पदावर शशांक मनोहर यांना बसवण्यात येऊ नये तर यापदी अरुण जेटली चालतील, अशी त्यांची तिसरी मागणी आहे. त्याचबरोबर आयसीसीशी संवाद साधताना मी भारताचे प्रतिनिधित्व करेन, अशीही छुपी मागणी त्यांनी केली आहे.

Story img Loader