स्पॉट फिक्सिंग हे माझ्या आयुष्याचे टार्गेटही नव्हते आणि टॉपिकही नाही, या शब्दांत पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच असद रौफ यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बुधवारी फेटाळले आहेत. पाकिस्तानातील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रौफ यांनी आपण आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग किंवा सट्टेबाजी कधीही केलेली नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नेमलेल्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास मी तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सट्टेबाजीच्या आरोपावरून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार असद रौफ हे देखील सट्टेबाजांना सट्टेबाजीसाठी मदत करत होते, अशी माहिती पुढे आली. पवन आणि संजय जयपूर या सट्टेबाजांनी रौफ यांना एक सिमकार्डही दिले होते. याच सिमकार्डवरून रौफ सट्टेबाजांना आवश्यक असलेली माहिती पुरवत होते, अशी माहिती पोलिस तपासात मिळाली. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू आणि काही सट्टेबाजांना अटक केल्यानंतर रौफ हे तातडीने २१ मे रोजी पाकिस्तानला निघून गेले होते. सट्टेबाजीच्या प्रकरणात रौफ यांचे नाव आल्यानंतर आयसीसीने त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळले आहे.

Story img Loader