तामिळनाडूच्या विल्लुपरम आणि चेंगलपट्टू या दोन जिल्ह्यांत विषारी दारू प्यायल्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. तर, ३३ हून अधिक लोकांवर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. या दोन जिल्ह्यांत एकाचवेळी १० जणांचा मृत्यू झाले असल्याने पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील घटनेचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत असून याप्रकरणी बनावट दारू विकल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विल्लपुरम जिल्ह्यातील मरमक्कम येथील एकियारकुप्पम येथे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित चार मृत्यू चेंगलपट्टू येथील चिथामूर येथे मृत्यू झाले आहेत. इथेनॉल आणि मिथेलॉन मिश्रित बनावट मद्य प्राशन केल्याने हे मृत्यू झाले असल्याची प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे.

“विल्लपुरम जिल्ह्यातील सहा जणांना काल (१४ मे) उलट्या, डोळ्यांत जळजळ आणि चक्कर येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारांदरम्यान चौघांचा मृत्यू झाला. तर, दोघांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. परंतु, कालांतराने या दोघांचाही मृत्यू झाला”, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच, ३३ लोकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचेही सांगण्यात आले आहे. याप्रकरणात अमरान याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >> कर्नाटकचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

दुसरी घटना चेंगलपट्टू येथे घडली आहे. येथे एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण एकाच घरातील आहेत. सुरुवातीला हे कौटुंबिक आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु, अधिक चौकशी केली असता बनावट दारूच्या प्राशनाने त्यांचा जीव गेल्याचे उघड झाले. त्यानंतर, अशीच लक्षणे आणखी दोघांना जाणवू लागली. त्यांचाही यावेळी मृत्यू झाला. या प्रकरणात अम्मावसईला अटक करण्यात आली आहे.

दोन्ही घटनांमध्ये दोघांना अटक करण्यात आली असून काही जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, काही पोलीस उपनिरिक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spurious liquor kills 10 people in tamil nadu many hospitalised sgk