श्रीलंकेची नागरिक असलेली एक महिला विमान दुर्घटनेत १९९८ मध्ये मरण पावली असल्याचा समज होता मात्र ती अद्यापही जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिलेचे नाव गुणमणी बालसुब्रह्मण्यम असे असून ती दुर्घटनाग्रस्ता विमानातील प्रवासी नव्हती. तर एका प्रवाशाकडे केवळ तिचे ओळखपत्र होते, असे स्पष्ट झाले आहे. गुणमणी ही जाफनातील रहिवासी असून तिचा लायन एअर कंपनीच्या विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याचा समज होता. एलटीटीईने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सदर विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते.
उत्तरेकडील इरनथिवू या बेटाजवळच्या खोल समुद्रातून श्रीलंकेच्या नेव्हीने या विमानाचे अवशेष अलीकडेच बाहेर काढले. त्या वेळी गुणमणी यांचे राष्ट्रीय ओळखपत्र मिळाले. आपण १९९५ मध्ये ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्या वेळी जाफनामध्ये एलटीटीईच्या कारवाया जोरात सुरू होत्या. त्यामुळे आम्ही जाफनातून स्थलांतर करून वावुनिया येथे आलो, असे गुणमणी यांनी एका वृत्तपत्राला सांगितले.
जाफना ते वावुनिया जोडणारा रस्ता नसल्याने आपल्या बहिणीने जाफनाहून कोलंबोला येणाऱ्या एका प्रवाशाकडे आपले ओळखपत्र दिले. त्यानंतर ज्या विमानातून हा प्रवासी येत होता त्यावर एलटीटीईने हल्ला चढविला. त्यामध्ये विमानातील कर्मचाऱ्यांसह सर्व म्हणजे ४८ जण ठार झाले.
श्रीलंका : १९९८ च्या विमान दुर्घटनेतील ‘बळी’ अद्याप जिवंत
श्रीलंकेची नागरिक असलेली एक महिला विमान दुर्घटनेत १९९८ मध्ये मरण पावली असल्याचा समज होता मात्र ती अद्यापही जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर महिलेचे नाव गुणमणी बालसुब्रह्मण्यम असे असून ती दुर्घटनाग्रस्ता विमानातील प्रवासी नव्हती. तर एका प्रवाशाकडे केवळ तिचे ओळखपत्र होते, असे स्पष्ट झाले आहे.
First published on: 18-05-2013 at 12:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka 1998 plane crash victim still alive