Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटामुळे निर्माण झालेली राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक चिघळत चालल्याचं दिसू लागलं आहे. एकीकडे आर्थिक संकटामुळे जनतेचं कंबरडं मोडलं असताना दुसरीकडे राजकीय पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून या संकटावर उपाय शोधण्यासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीयेत. त्यामुळे जनता अधिकाधिक आक्रमक होत असताना श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. ते मालदीवमध्ये गेले असून तिथून दुबईला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रानील विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेत अभूतपूर्व परिस्थिती

गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे एकूणच श्रीलंकेतील राजकीय व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या कुटुंबाकडे असणाऱ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असतानाच श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, परकीय गंगाजळीचा आटत चाललेला साठा आणि रोजच्या आहारासाठी देखील रस्त्यावर उतरण्याची नागरिकांवर आलेली वेळ या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा रोष आणि आर्थिक आरिष्ट या पार्श्वभूमीवर चिघळलेली परिस्थिती पाहून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी मालदीवमध्ये पळ काढला आहे.

आता जबाबदारी विक्रमसिंघे यांच्या खांद्यावर!

राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी पलायन केल्यानंतर पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदाचे सर्व अधिकार त्यांनी बहाल केल्याची माहिती श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेयवर्धने यांनी दिली आहे. त्यामुळे आता सध्याच्या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारी रानील विक्रमसिंघे यांच्यावर येऊन पडली आहे. विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा केली असून इथून पुढे सर्व अधिकार हे केंद्रीय सत्तेच्या हाती असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. देशातील अनेक संवेदनशील भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Sri Lanka crisis: गोटाबायांच्या पलायनात भारताचा हात नाही; दूतावासाचं स्पष्टीकरण

आजारी पडू नका – वैद्यकीय तज्ज्ञांचं इशारेवजा आवाहन!

दरम्यान, एकीकडे श्रीलंकेमध्ये राजकीय अराजक निर्माण झालेलं असताना दुसरीकडे वैद्यक क्षेत्राकडून वेगळीच भिती व्यक्त करण्यात आली असून इशारा देण्यात आला आहे. “कुणीही आजारी पडू नका किंवा अपघातग्रस्त होऊ नका”, असं आवाहन देशातील अनेक जॉक्टरांनी केलं आहे. देशाच्या आर्थिक दुरवस्थेमुळे निर्माण झालेल्या औषधांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर वैद्यक क्षेत्राकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka crisis economy emergency declared ranil wikremesinghe president flee to maldives pmw