श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली असताना अध्यक्ष गोताबाया राजपक्षे देश सोडून पळून गेले आहेत. यानंतर पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नियुक्ती होताच रनिल विक्रमसिंघे यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. दरम्यान पश्चिम प्रांतात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असल्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सनथ जयसूर्याने संताप व्यक्त केला आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनथ जयसूर्याने काय म्हटलं आहे-

पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी पश्चिम प्रांतात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्याचे आदेश दिल्यानंतर सनथ जयसूर्याने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत त्याने म्हटलं आहे की, “कल्पना करा की, क्रिकेटर नसून अभिनेता असल्याने निवडकर्त्यांनी नाकारल्यानंतरही मिस्टर बीनला संघात आणलं आहे. पंचांनी बाद केल्यानंतरही तो फक्त खेळत नाहीये, तर मैदान सोडण्यासही नकार देत आहे”.

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी: रानील विक्रमसिंघेंची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

“अजून कोणताही खेळ नको. क्रिकेटमध्ये शेवटच्या खेळाडूला एकट्याने फलंदाजी करण्याची परवानगी नसते. सन्मानाने बाहेर पडा,” असा सल्लाही जयसूर्याने दिला आहे.

जयसूर्याने याआधीही मिस्टर बीन यांचा संदर्भ देत अध्यक्ष आणि पंतप्रधानांवर टीका केली होती. “लोकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे. राजीनाम्याचा कोणता भाग किंवा घऱी जाण्याची भाषा तुम्हाला समजत नाही आहे. लोकांच्या आयुष्यासोबत खेळण्यासाठी हा मिस्टर बीनचा चित्रपट नाही”.

दरम्यान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सर्वपक्षीय सरकार सत्ता हातात घेण्यास तयार असेल तेव्हा आपण पायउतार होऊ असं स्पष्ट केलं आहे.

श्रीलंकेत अभूतपूर्व परिस्थिती

गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे एकूणच श्रीलंकेतील राजकीय व्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या कुटुंबाकडे असणाऱ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असतानाच श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, परकीय गंगाजळीचा आटत चाललेला साठा आणि रोजच्या आहारासाठी देखील रस्त्यावर उतरण्याची नागरिकांवर आलेली वेळ या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचा रोष आणि आर्थिक आरिष्ट या पार्श्वभूमीवर चिघळलेली परिस्थिती पाहून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी मालदीवमध्ये पळ काढला आहे.

आता जबाबदारी विक्रमसिंघे यांच्या खांद्यावर!

राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी पलायन केल्यानंतर पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदाचे सर्व अधिकार त्यांनी बहाल केल्याची माहिती श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेयवर्धने यांनी दिली आहे. त्यामुळे आता सध्याच्या गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्याची जबाबदारी रानील विक्रमसिंघे यांच्यावर येऊन पडली आहे. विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा केली असून इथून पुढे सर्व अधिकार हे केंद्रीय सत्तेच्या हाती असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. देशातील अनेक संवेदनशील भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka crisis sanath jayasuriya slams prime minister ranil wickremesinghe with reference of mr bean sgy