श्रीलंकेत अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्याने महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महागाई दर आतापर्यंतचा सर्वोच्च नोंदवण्यात आला आहे. महागाई दर हा १२.१ टक्क्यांपर्यंत वाढल्याने श्रीलंकेतील खाद्यपदार्थांच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहे. नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर महिन्यात २.२ टक्क्यांनी महागाई वाढली आहे.
श्रीलंकन न्यूज रेडिओने दिलेल्या अहवालानुसार, कोलंबो ग्राहक किंमत निर्देशांकातील (Colombo Consumer Price Index) बदल, जो वार्षिक सरासरीच्या आधारावर मोजला तो नोव्हेंबरमध्ये ५.३ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये तब्बल ६ टक्क्यांपर्यंत वाढला. यावर एक निवेदन जारी करत सेंट्रल बँकेने म्हटले आहे की पुरवठा साखळीतील घटक महागाई वाढण्यास मुख्य कारणीभूत आहेत. दर महिन्याला खाद्य आणि इतर या दोन्ही श्रेणीतील वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने महागाई वाढली आहे, असे न्यूजरेडिओने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
त्यानंतर, अन्नधान्य महागाई नोव्हेंबर २०२१ मध्ये १७.५ टक्क्यांवरून डिसेंबर मध्ये २२.१ टक्क्यांपर्यंत वाढली, तर खाद्येतर महागाई नोव्हेंबर २०२१ मध्ये ६.४ टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये ७.५ टक्क्यांपर्यंत वाढली. दरम्यान, सरकारने कृषी रासायनिक आयातीवर मध्यंतरी बंदी घातली होती. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई अधिक तीव्र झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पीक न आल्याने आणि नंतर शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केल्याने सरकारने ही बंदी उठवली होती. पण त्याचा फटका मात्र बसलाय हे नक्की.