कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणात भारतावर केलेल्या आरोपांची जगभरात चर्चा चालू आहे. त्यात अमेरिका व ऑस्ट्रेलियानं कॅनडाच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांवर या प्रकरणाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता श्रीलंकेनं भारताच्या बाजूने भूमिका घेतली आहे. श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली सॅब्रि यांनी या मुद्द्यावरून जस्टिन ट्रुडो यांना सुनावलं असून कॅनडामध्ये दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय मिळतो, असा दावा त्यांनी केला आहे. एएनआयशी बोलताना अली सॅब्रि यांनी ट्रुडोंना सुनावलं आहे.
काय म्हणाले अली सॅब्रि?
जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेले आरोप ऐकून आपल्याला अजिबात आश्चर्य वाटलं नसल्याचं सॅब्रि म्हणाले आहेत. “ट्रुडो हे नेहमी असे खळबळजनक आणि बिनबुडाचे आरोप करत असतात. काही दहशतवाद्यांना कॅनडामध्ये आश्रय मिळाला आहे. अशा प्रकारे निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांची सवयच आहे. त्यांनी असाच प्रकार श्रीलंकेच्या बाबतीतही केला होता. श्रीलंकेत वंशहत्या झाल्याचं ते म्हणाले होते. पण यात तथ्य नसल्याचं सगळ्यांना माहिती आहे”, असं अली सॅब्रि म्हणाले आहेत.
१८ जून रोजी कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. हे आरोप भारतानं फेटाळले असून यावरून दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. भारतानं कॅनडातील आपली व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली आहे.
“…म्हणून मला आश्चर्य वाटलं नाही”
एकीकडे अमेरिका, ऑस्ट्रेलियासारखे देश कॅनडाची बाजू घेत असताना श्रीलंकेनं जाहीरपणे भारताची बाजू घेतली आहे. “दुसऱ्या महायुद्धात नाझींसाठी लढणाऱ्या एका व्यक्तीचा ट्रुडोंनी संसदेत सन्मान केल्याचा व्हिडीओ मी पाहिला. त्यामुळे ट्रुडोंनी भारतावर आरोप केल्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. ट्रुडो अशा प्रकारचे आरोप करत असतात”, असं अली सॅब्रि म्हणाले आहेत.
“मला वाटतं कोणत्याही देशानं इतर देशांमध्ये आपलं नाक खुपसू नये. त्यांना सांगू नये की त्यांनी देश कसा चालवायला हवा. आमचं आमच्या देशावर प्रेम आहे म्हणून आम्ही आमच्या देशात आहोत. अशा प्रकारच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो. आमचे व्यवहार कसे करावेत हे आम्हाला कुणी शिकवू नये”, असंही सॅब्रि यांनी नमूद केलं.