७ ठार, तीन हजारांहून अधिक नागरिक बेघर
श्रीलंकेच्या उत्तर आणि दक्षिण भागांना ‘महासेन’ चक्रीवादळाचा तडाखा बसला असून त्यामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे किमान सात जण ठार झाले असून तीन हजारांहून अधिक जण बेघर झाले आहेत.
चक्रीवादळाच्या तडाख्यात सात जण ठार झाले असून अद्याप दोघांचा पत्ता लागलेला नाही, असे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या वतीने सांगण्यात आले. वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या २८०० हून अधिक बेघरांसाठी चार ठिकाणी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.
बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्येकडे गेल्या काही दिवसांपासून आलेले हे वादळ आता शांत होत असून ते जाफनाच्या ईशान्य भागाकडे ७५० कि.मी. अंतरावर स्थिरावले आहे, असे कोलंबो वेधशाळेचे अधिकारी जीवन करुणारत्ने यांनी सांगितले. श्रीलंकेतील डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून तेथे काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. खराब हवामानाचा इशारा झुगारून मच्छीमारीसाठी गेलेल्या जवळपास ६० बोटींना श्रीलंकेच्या पूर्व भागांतील तटवर्ती किनाऱ्यावरून सुरक्षित स्थळी आणण्यात आले आहे.