श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे गुरुवारी (१४ जुलै) मालदीवहून सिंगापूरला रवाना झाले आहेत. श्रीलंकेत आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. आर्थिक संकटामुळे अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. नागरिकांमधील संतापाने उग्र रुप धारण केल्याने आंदोलक थेट राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात शिरले. त्यामुळे राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केले आहे.
श्रीलंकेतील सरकारी सूत्रांनी राऊटर्सला दिलेल्या माहितीनुसार, गोटाबाया राजपक्षे सिंगापूरमध्ये थांबणार आहेत. राजपक्षे यांनी बुधवारी (१३ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं कबुल केलं. मात्र, श्रीलंकेच्या संसद सभापतींना अद्याप राजपक्षे यांचा राजीनामा मिळालेला नाही. त्यामुळे श्रीलंकेतील सर्वपक्षांनी एकत्र येत सर्वपक्षीय सरकार स्थापनेच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
श्रीलंकेत होणाऱ्या घडामोडींबाबतचे १० महत्त्वाचे मुद्दे
१. श्रीलंकेतील उग्र आंदोलनांची वाढती संख्या पाहता कोलंबोसह पश्चिम श्रीलंकेत अनिश्चितकालीन आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी सुरक्षा दलाला दंगल भडकावणाऱ्या आंदोलकर्त्यांना अटकेचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
२. हजारो आंदोलक राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर उतरले आहेत. तसेच श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. राजपक्षे मालदीवला पळून गेल्याचंही वृत्त आहे.
३. आंदोलकांनी राजपक्षे यांच्या मागणीसह श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलाकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. हंगामी अध्यक्ष रानील विक्रमसिंघे यांनी सांगितलं की राजपक्षे यांनी सर्व पक्षांचं सरकार सत्तेवर आलं की ते पदावरून बाजूला जातील, असं म्हटलं आहे.
४. दरम्यान, श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आपली पत्नी आणि दोन सुरक्षा रक्षकांसह लष्करी विमानाने कोलंबोतून मालदीवला गेल्याची चर्चा आहे. राजपक्षे यांचे लहान भाऊ बसिल राजपक्षे यांनी देखील श्रीलंका सोडल्याचं वृत्त आहे.
५. गोटाबाया राजपक्षे यांनी सुरक्षा दलाकडे एका विमानाची मागणी केली होती. राजपक्षे राष्ट्राध्यक्ष आणि सुरक्षा दलाचे प्रमुख असल्याने सैन्यानेही त्यांना हे विमान दिलं आणि मग ते श्रीलंका सोडून गेल्याचं बोललं जात आहे.
६. मालदीव विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालदीवमध्ये गेल्यानंतर राजपक्षे कुटुंबासह पोलीस संरक्षणात एका गुप्त ठिकाणी थांबले आहेत.
७. गोटाबाया राजपक्षे अद्यापही पदावर असल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण आहे. त्यामुळेच पदाचा राजीनामा देण्याआधी त्यांनी श्रीलंका सोडण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून देशातच स्थानबद्ध होण्याची नामुष्की येणार नाही.
८. राजपक्षे यांनी बुधवारी (१३ जुलै) आपल्या पदाचा राजीनामा देऊन शांततापूर्ण सत्तेचं हस्तांतरण करण्यास मान्यता दिलीय. श्रीलंकेच्या सर्व पक्षांनी पुढे येत सर्वपक्षीय सरकार स्थापन करून २० जुलैला नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
९. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांना आपल्या कुटुंबासह देशाबाहेर पळून जाण्यासाठी भारताने मदत केल्याचे आरोप भारतीय दुतावासाने फेटाळले आहेत. तसेच भारत श्रीलंकेच्या नागरिकांसोबत असल्याचं मत व्यक्त केलं.
हेही वाचा : विश्लेषण : शेतीविषयक कोणत्या धोरणामुळे श्रीलंकेवर आर्थिक संकट?
१०. दरम्यान, याआधी श्रीलंकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी गोटाबाय राजपक्षे व बसिल राजपक्षे यांना देश सोडून जाण्यासाठी परवानगी न दिल्याने ते श्रीलंकेतच अडकले होते. इतर विमान कंपन्यांनीही आंदोलन केलंय. आंदोलकांनी राजपक्षे यांच्यावर देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केलाय.