पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या १२ दिवसांच्या दुबई व स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, आपल्या दौऱ्यादरम्यान ममता बॅनर्जींची दुबई विमानतळावर अनपेक्षितपणे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रनिल विक्रमसिंघे यांची भेट झाली. यावेळी रनिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींना विचारलेल्या एका प्रश्नाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रश्नानंतर खुद्द ममता बॅनर्जी यांनीही रनिल विक्रमसिंघे यांच्या प्रश्नावर दिलखुलास दाद दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पीटीआयनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
काय घडलं नेमकं?
ममता बॅनर्जी आपल्या १२ दिवसांच्या दौऱ्यासाठी दुबईला दाखल झाल्या असताना विमानतळावरच त्यांची रनिल विक्रमसिंघे यांच्याशी भेट झाली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी रनिल विक्रमसिंघे यांना कोलकात्यात पुढील महिन्यात होणाऱ्या ग्लोबल बिझनेस समिटमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. तसेच, विक्रमसिंघे यांनीही ममता बॅनर्जींना श्रीलंकेला येण्याचं आमंत्रण दिलं. खुद्द ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
विक्रमसिंघेंचा प्रश्न आणि दिलखुलास दाद!
दरम्यान, या भेटीच्या वेळी रनिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींची रीतसर परवानगी घेऊन त्यांना एक प्रश्न केला. ममता बॅनर्जींनीही त्याला दिलखुलासपणे उत्तर दिलं. “मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का?” असं विक्रमसिंघे यांनी विचारताच ममता बॅनर्जींनी “हो, प्लीज विचारा”, असं म्हणत होकारार्थी उत्तर दिलं.
विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व!
रनिल विक्रमसिंघे यांनी ममता बॅनर्जींना विरोधी पक्षांच्या आघाडीसंदर्भात प्रश्न विचारला. “तुम्ही विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व करणार का?” असं रनिल विक्रमसिंघे यांनी विचारल्यावर ममता बॅनर्जींनी “हे लोकांवर अवलंबून आहे ना”, असं म्हणत सविस्तर उत्तर देणं टाळलं. मात्र. त्याचवेळी, “विरोधी पक्ष यावेळी सरकारला टक्कर देण्याच्या पूर्ण स्थितीत असेल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.