श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्याच्या निमित्ताने येथे आगमन झाले. राजपक्षे यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीतील हा सहावा चिनी दौरा आहे, मात्र आपल्या दौऱ्याने अन्य कोणाच्याही हितसंबंधांना बाधा आणण्याचा आपला उद्देश नाही, असे श्रीलंकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
चीनमध्ये नव्या पंतप्रधानांनी आणि राष्ट्राध्यक्षांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात श्रीलंकेच्या विविध विकास प्रकल्पांना चीनकडून भरघोस आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. राजपक्षे यांचे निवासस्थान असलेल्या शहरात हंबँटोटा या बंदराच्या बांधणीच्या प्रकल्पासारखे पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
दहशतवादाचा बीमोड करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत चीनने लंकेला आजवर कायमच मदत केली आहे. मात्र चीन आणि श्रीलंका या दोन देशांतील परस्पर संबंधांबाबत भारताने भुवया उंचावल्या असल्याच्या बातम्या चीनमधील काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र या मैत्रीत संशयास्पद असे काहीच नाही, कोणाचेही हितसंबंध दुखावण्याचा विचार नसल्याचे चीनने स्पष्ट केले.

Story img Loader