अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा आयोजित केला आहे. देशभरात या सोहळ्याची उत्सुकता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होईल. देशभरातील हजारो लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय, हजारो साधू-संत, कलाकार, खेळाडू आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, भारतातील चार मठांच्या (पीठ) चार शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं जाहीर केलं आहे. हिंदू धर्मात शंकराचार्यांचे पद महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी, असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितलं की, ‘‘हा सोहळा (२२ जानेवारी रोजी अयोध्येत होणारा कार्यक्रम) सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला चार शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्याहीप्रति द्वेष नाही. परंतु, हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे.
अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे चुकीचे आहे. आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही. मंदिराच्या बांधकामात आणि कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतलेले हिंदू धर्मातील प्रस्थापित सर्वच जण या नियामांकडे दुर्लक्ष करत आहेत.
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य म्हणाले, “खरंतर आपल्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करून त्यानंतर तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. परंतु, आपण खूप घाई करत आहोत. परंतु, आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. आम्ही या कार्यक्रमाला जाणार नसल्याने कदाचित या कार्यक्रमाचे आयोजनकर्ते आम्हाला मोदीविरोधी म्हणतील. मात्र आम्ही मोदीविरोधी नाही. परंतु, आम्ही आमच्या धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ शकत नाही.” तर, स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले, “सर्व काही धर्मग्रंथांतील पद्धतीप्रमाणे झाले पाहिजे आणि श्रीरामचंद्र हे धर्मनिरपेक्ष नव्हते, या धारणेला अनुसरून भक्ती केली गेली पाहिजे. धर्मग्रंथांनुसार प्राणप्रतिष्ठा आणि भक्ती झाली नाही, तर सैतानी शक्तींचा प्रवेश होतो आणि सर्वत्र गोंधळ माजतो.” हीच भूमिका इतर दोन शंकराचार्यांनी मांडली आहे.
हे ही वाचा >> “आता मथुरेत कृष्णाचं भव्य मंदिर…”, भाजपा खासदार हेमामालिनी यांचं वक्तव्य चर्चेत
शंकराचार्यांच्या भूमिकेवर रविशंकर यांचा आक्षेप
दरम्यान, शंकराचार्यांच्या या भूमिकेवर अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी आक्षेप घेतला आहे. रविशंकर यांनी काही वेळापूर्वी पीटीआयशी बतचीत केली. यावेळी ते म्हणाले, तुम्ही तिरुवन्नामलाई मंदिराचं उदाहरण घ्या. हे मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा खूप लहान होतं. नंतर तिथे मोठं मंदिर उभारण्यात आलं. मदुराईमधील मंदिरदेखील असंच एक उदाहरण आहे. आपल्या देशात अशी अनेक मंदिरं आहेत जी सुरुवातीला खूप लहान होती. परंतु, नंतर तिथे मोठी मंदिरं बांधण्यात आली किंवा त्यांचा जिर्णोद्धार केला गेला. इतकंच काय तर प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर देखील सुरुवातीला खूप लहान होतं. नंतरच्या काळात काही राजांनी तिथे मोठं मंदिर उभारलं. प्राणप्रतिष्ठेनंतरही मंदिरं बांधण्याची तरतूद असते.