श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) छावणीवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या एका दहशतवाद्यांला शुक्रवारी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. चत्ताबाल भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
चत्ताबाल भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. शुक्रवारी सकाळी हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकून अबू तालिब याला अटक केली. तो मुळचा पाकिस्तानातील मुल्तानमधील राहणार असल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली.
बेमिना भागात सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला होता. तेथून जवळ असलेल्या घरात हा संशयित दहशतवादी लपून बसलेला होता. पोलिसांच्या पथकाने कारवाईला सुरूवात केल्यावर तालिब याने आपल्याकडील पिस्तूलच्या साह्याने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.
गेल्या बुधवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे पाच जवाना शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये अन्य सात जवान जखमी झाले आहेत.