पाकिस्तानचा झेंडा फडकावत आणि भारतविरोधी घोषणा देत काश्मीर खोऱ्यात मोर्चा काढणाऱ्या फुटीरवादी नेता मसरत आलम याला शुक्रवारी अटक करण्यात आली. आलमच्या अटकेचे तीव्र पडसाद खोऱ्यात उमटले. पुलवामा जिल्ह्य़ातील त्राल येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या लष्करी कारवाईत दोन तरुण ठार झाले. श्रीनगरच्या नौहट्टा भागात निदर्शकांनी राष्ट्रध्वज जाळला, तसेच पोलिसांवर दगडफेक केली.   दरम्यान, भारताच्या एकसंधतेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिला.  

देशविरोधी कारवाया आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळेच आलमने पाकिस्तानचा झेंडा उंचावताच गृहमंत्री राजनाथसिंह यांनी काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना आलमच्या अटकेचे आदेश दिले. काश्मिरातील घटनांची गंभीर दखल केंद्राने घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. असे प्रकार यापुढे घडणार नाहीत, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
– किरेन रिजिजु, केंद्रीय गृहराज्यमंत्री

‘सरकारपुरस्कृत दहशतवाद’ हा जम्मू-काश्मिरातील फार मोठा मुद्दा आहे. गेल्या दहा वर्षांत १० हजार लोक बेपत्ता असून याबाबत संसदेत, दिल्लीत किंवा इतरत्र कुणीही काहीच बोलत नाही, हे दुर्दैवी आहे. या मुद्दय़ावर आम्ही निदर्शने
सुरूच ठेवू.
– मिरवाईझ उमर फारूक, हुर्रियतचा नेता

Story img Loader