स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नेमलेली समिती बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कान उपटले असतानाही मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन पुन्हा एकदा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. येत्या दोन ऑगस्ट रोजी होणाऱया बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. श्रीनिवासन यांनी मंगळवारी संध्याकाळीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्याची माहिती मिळालीये.
चेन्नई सुपरकिंग्जचे सहमालक गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांची स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने दोन सदस्यीय समिती नेमली होती. समितीमध्ये उच्च न्यायालयाचे माजी न्या. टी. जयराम चौटा आणि आर. बालसुब्रमण्यम यांचा समावेश होता. या समितीने रविवारी आपला अहवाल बीसीसीआयच्या कार्यकारी समितीकडे दिला. या अहवालात गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचा पुरावा आढळलेला नसल्याचे म्हटले होते. मयप्पन आणि कुंद्रा या दोघांनाही या समितीने क्लिन चीट दिली होती. मयप्पन हे श्रीनिवासन यांचे जावई असल्यामुळे त्यांनी समितीचा अहवाल मिळेपर्यंत आपल्या पदाचा कार्यभार माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडे दिला होता. समितीचा अहवाल मिळाला असून, त्यामध्ये मयप्पन यांना क्लिन चीट दिलेली असल्यानेच श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला असल्याचे सूत्रांनी सांगितले.