प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाचा हकानाक बळी गेल्याची घटना दिल्लीत घडली आहे. इन्स्टाग्रामवरून झालेली मैत्री, मैत्रीचं प्रेमात झालेलं रुपांतर आणि मग प्रेमात झालेली फसवणूक यावरुन एका तरुणाने कथित प्रेयसीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. याप्रकरणी आता अरमान खान (१८) याला पोलिसांनी अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अरमान खानची एका मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तसंच, या २१ वर्षीय तरुणीचा माहिर नावाचाही मित्र होता. एकदा माहिर तरुणीच्या घरी गेला असता त्याला ही तरुणी अरमानसह व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसली. याचा राग मनात येऊन माहिरने अरमानला शिवीगाळ केली. या वादात अरमानने तरुणीचा मोबाईल काढून घेतला.
मोबाईल देतो सांगून बोलावलं अन्
तरुणी दोघांना एकाच वेळी डेट करत होती. तसंच, तिला अरमानपेक्षा माहिर जास्त आवडत होता, हे समजल्यावर अरमान अधिक चिडला. त्यामुळे अरमानने तिचा मोबाईल काढून घेतला. हा मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने अरमानने माहिरला एका ठिकाणी भेटायला बोलावले. माहिर ठरलेल्या ठिकाणी येताच चिडलेल्या अरमानने माहिरवर हल्ला करायला सुरुवात केली. अरमानने त्याच्यावर ५० वेळा चाकूने वार केले. त्याच्याबरोबर फैजल (२१) आणि मोहम्मद समीर (१९) हे मित्रही होते. या हल्ल्यात माहिरचा जागीच मृत्यू झाला. हा मृतदेह त्यांनी भागीरथ विहारमध्ये रस्त्याच्या कडेला टाकून दिला.
हेही वाचा >> धक्कादायक! घरात सापडले पाच सांगाडे, एकाच कुटुंबातले सदस्य असल्याची माहिती
पोलिसांना सापडला मृतदेह
पोलिसांना हा मृतदेह मिळाल्याने पुढील घटनेचा तपास लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिरच्या अंगावर चाकूच्या अनेक जखाम होत्या. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनास्थळी एक चाकूही सापडला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. माहिर मध्ये दिल्लीच्या पहाडगंजमध्ये फ्लेक्स बोर्ड बनवणाऱ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता.
कॉल रेकॉर्डिंगमुळे लागला छडा
तपासादरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसंच, माहिरचे कॉल रेकॉर्डिंगही तपासले. कॉल रेकॉर्डिंगमुळे पोलीस संबंधित तरुणीपर्यंत पोहोचले. तिने या दोघांमधील वादाबाबत माहिती दिली.
महिलेचा जबाब आणि घटनेच्या वेळी साक्षीदारांच्या आधारे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालायने न्यायालयीन कोठडी सुनावली असून लवकरच त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
हेही वाचा >> बॉस खिल्ली उडवतो म्हणून कर्मचारी महिलेने घडवली अद्दल! हनी ट्रॅप रचला, नग्न फोटो मिळवले आणि….
तिन्ही आरोपी हे भागीरथ विहार येथे राहणारे आहेत. १८ वर्षीय मुख्य आरोपी अरमान खानचं एक जनरल स्टोअर आहे. तर, २१ वर्षीय फैजल खान एलसीडी टीव्ही रिपेअरिंगचं काम करतो. तर, तिसरा आरोपी मोहम्मद समीर भंगार विक्रेता आहे.