अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यायालयाने एका भारतीय वंशाच्या नागरिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २०२० मध्ये पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. फिलिप मॅथ्यू असं शिक्षा झालेल्या आरोपी पतीचं नाव आहे, तर मेरीन जॉय असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे.
‘द सन सेंटिनेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०२० मध्ये आरोपी फिलिप मॅथ्यूने आपली पत्नी मेरीन जॉय (२६) हिची कार अडवून तिच्यावर तब्बल १७ वेळा चाकूने वार केले. एवढंच नव्हे तर आरोपीनं घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी तिच्या अंगावरून गाडी चालवली. या घटनेनंतर, जॉयचे सहकारी तिच्या मदतीला धावले. तेव्हा जॉय फक्त “मला बाळ आहे,” असं वारंवार ओरडत होती. जॉयने तिच्या मृत्यूपूर्वी तिच्या हल्लेखोराची माहिती दिली. ज्यामुळे अखेरीस आरोपीला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी (३ नोव्हेंबर २०२३) आरोपी मॅथ्यूने आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणातील आरोपांना आव्हान न देण्याची विनंती केली. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय, पत्नीवर प्राणघातक शस्त्राने गंभीर हल्ला केल्याबद्दल त्याला आणखी पाच वर्षांची शिक्षाही झाली आहे. आरोपी मॅथ्यूने आरोपांना आव्हान न देण्याच्या निर्णय घेतल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली अन्यथा त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता होती, असंही ‘द सन सेंटिनेल’च्या वृत्तात नमूद केलं आहे.
हेही वाचा- बंगळुरूमधील महिला अधिकाऱ्याच्या हत्येचं गूढ उलगडलं; संशयिताला अटक, खूनाचं नेमकं कारण काय?
विशेष म्हणजे, जॉय ही मॅथ्यूसोबत तिचं नाते संपवण्याचा विचार करत होती. पण तत्पूर्वीच तिची हत्या झाली. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना स्टेट अॅटर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्या पॉला मॅकमोहन यांनी सांगितलं की, संबंधित प्रकरणातील आरोपांना आरोपी मॅथ्यूने आव्हान न देण्याचा निर्णय घेतल्याने आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनिश्चित झाल्याने त्याची फाशीची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.