* महागडय़ा गाडय़ांच्या आयातीवरील कर बुडवल्याचे प्रकरण
* पाठिंबा काढून घेतल्यामुळे द्रमुकचा वचपा काढल्याची चर्चा
द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घ्यायला ४८ तास उलटत नाहीत तोच द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांचा मुलगा एम. के. स्टॅलिन याच्या घरावर बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले.
विदेशी गाडय़ांच्या आयातीवरील कर बुडवला म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी सत्ताधारी यूपीएचा पाठिंबा काढून घेतल्याचा वचपा म्हणून केंद्राने सीबीआयच ससेमिरा लावल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे. मात्र, द्रमुकने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा आणि सीबीआयच्या छाप्यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसल्याची सारवासारव केंद्र सरकारने केली आहे.
सीबीआय पथकाने सकाळीच स्टॅलिन यांच्या घरावर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. त्यांनी अनेक विदेशी
बनावटीच्या महागडय़ा गाडय़ा आयात करून त्यांच्यावरील कर बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठीच त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
मात्र, या प्रकाराचे राजकीय पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. सीबीआयचा कारभार पंतप्रधान कार्यालयातील मंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्याकडे असल्याने केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा राजकीय वचपा म्हणूनच ही कारवाई करण्यात आल्याचा कांगावा द्रमुकने केला आहे.
परंतु पंतप्रधान कार्यालयाने या गोष्टींचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे स्पष्ट करत द्रमुकचा आरोप फेटाळून लावला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा