Stampede at Tirumala Tirupati Temple: आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानमध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. या देवस्थानमध्ये होणाऱ्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासन समितीकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, यानंतरही बुधवारी रात्री तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये आत्तापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून किमान ३० जण जखमी झाले आहेत. मंदिर व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांनी आता या चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत ठरलेली बाब इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी संध्याकाळी तिरुपती देवस्थानमधील बैरागीपट्टेडाजवळ ही चेंगराचेंगरीची घटना घडली. यात जखमी झालेल्या ३० रुग्णांवर नजीकच्या रुइया हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. या ३० पैकी अनेकांना गंभीर जखमा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या सहा व्यक्तींपैकी तीन महिला आहेत. बहुतांश जखमी व्यक्ती तामिळनाडूच्याच रहिवासी असल्याचंही स्पष्ट झालं आहे. आंध्र प्रदेश सरकारनं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

नेमकं घडलं काय?

तिरूपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. ९ जानेवारी रोजीच्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून बाविकांना दर्शनासाठीचे टोकन वितरीत करण्यात येत होते. यासाठी देवस्थानकडून स्वतंत्र काऊंटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. असंच एक काऊंटर बैरागीपट्टेडा भागातील एमजीएम हाय स्कूलमध्ये उभारण्यात आलं होतं. विष्णू निवास मंदिराजवळच हे काऊंटर होतं. बुधवारी सकाळपासूनच या काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली. काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचंही दिसून आलं.

तिरुमला तिरुपती देवस्थानम अर्थात TTD चे प्रमुख बी. आर. नायडू यांनी यावेळी नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे. “बैरागीपट्टेडामधील काऊंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. आतली गर्दी नियंत्रित करण्यासाठी गेट काही काळ बंद ठेवण्यात आलं होतं. पण आत एका महिलेला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे सदर महिलेला बाहेर जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी गेट उघडण्यात आलं. पण नेमक्या त्याचवेळी गेटबाहेर उभे असलेले सर्व भाविक एकाचवेळी आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. यातून तिथे गडबड झाली आणि चेंगराचेंगरीचा प्रकार घडला”, असं नायडू यांनी नमूद केलं आहे.

Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. गुरुवारी त्यांनी तिरूमला देवस्थानला भेट दिली व मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सदर परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून संबंधित अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य ते उपचार होतील याची खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आल्याचं चंद्राबाबू नायडूंनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stampede at tirumala tirupathi deasthanam token counter chaos pmw