ओडिशामधील पुरी येथे आजपासून (७ जुलै) भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेला सुरुवात झाली आहे. रथयात्रेच्या पहिल्याच दिवशी या सोहळ्याला गालबोट लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. सायंकाळी या रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविक जखमी झाले आहेत. तसेच एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या शासकीय रुगणालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. काही भाविकांना लहान-मोठी इजा झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर गंभीर जखमी असलेल्या भाविकांवर उपचार केले जात आहेत. दरम्यान, ज्या भाविकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे ती व्यक्ती परराज्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप त्या व्यक्तीबाबतची माहिती मिळालेली नाही.

तब्बल ५३ वर्षांनंतर पुरीमध्ये भगवान जगन्नाथांची रथयात्रा दोन दिवस चालणार आहे. १९७१ पासून ही रथयात्रा एक दिवस चालत आली आहे. या वर्षी ही रथयात्रा दोन दिवस चालणार आहे. या रथयात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात. यंदाही रथयात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. दरम्यान, सायंकाळी गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. परिणामी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविक जखमी झाले आहेत.

या रथयात्रेदरम्यान, श्री बलभद्र यांचा रथ ओढत असताना ही दुर्घटना घडली आहे. बलभद्र यांचा रथ ओढण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्याचदरम्यान, तिथे गोंधळ उडाला, धक्काबुक्की सुरू झाली आणि या गोंधळाचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. अशातच एक भाविक जमिनीवर कोसळला. काही लोकांचा पाय त्याच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत शेकडो भाविक जखमी झाले आहेत.

यावर्षी भगवान जगन्नाथ हे त्यांचे बंधू श्री बलभद्र आणि बहीण सुभद्रेसह दोन दिवस त्यांच्या मावशीच्या घरी राहणार आहेत. ओडिशावासियांच्या धार्मिक परंपरेनुसार भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांवर ताव मारतात, त्यामुळे त्यांची तब्येत खराब होते. पुरी येथील जगन्नाथ यात्रेला हिदू धर्मात मोठं महत्त्व दिलं आहे. त्यामुळे दर वर्षी, ओडिशा आणि भारतासह जगभरातून भाविक पुरीच्या जगन्नाथ यात्रेत सहभागी होतात.

हे ही वाचा >> हाथरस दुर्घटनेप्रकरणी राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पत्र; म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारने…”

ओडिशावासियांच्या धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान जगन्नाथ आजारी पडतात. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते बरे होतात. हे सर्व विधी रविवारी सकाळी पार पडले. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा दुपारी अडीच वाजता त्यांच्या रथांवर स्वार झाले. रथयात्रा सुरू झाल्यानंतर काही तासांनी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.