Delhi Railway Station Stampede: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.

शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर झाली. ही घटना, रात्री ९:५५ वाजता घडली. खरंतर, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रयागराज जंक्शनवरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसरासह फूट ओव्हर ब्रिजवरील व्यवस्थेची जबाबदारीची सूत्रे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी आपल्या हाती घेतली आहेत.

रेल्वे मंत्र्यांची प्रतिक्रिया

या घटनेबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.” पुढे एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये अश्विनी वैष्णव म्हणाले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”

काळजीवाहू मुख्यमंत्री अतिशी यांनी घेतली रुग्णालयात धाव

दरम्यान, या घटनेनंतर दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री अतिशी यांनीही दुःख व्यक्त केले आहे. एक्सवर पोस्ट करत त्या म्हणाल्या, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेगरीत महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मी एलएनजेपी रुग्णालयात पोहोचली असून पीडितांच्या कुटुंबीयांना भेटली आहे. यामध्ये अनेक लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमचे दोन आमदार पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी रुग्णालयात उपस्थित आहेत.”

Story img Loader