हमास आणि इस्रायल यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी ( ७ ऑक्टोबर ) सकाळी इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले. प्रत्युत्तरात इस्रायल लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले आहेत. इस्राइलवरील हल्ल्यामुळे जगाला एकच धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलच्या पाठीशी उभे असल्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधान मोदी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हणाले, “इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानं मला धक्का बसला आहे. आमची प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहे. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.”
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ही ना कोणती मोहीम आहे, ना हा कुठला सामान्य गोळीबार आहे. हे युद्ध आहे. आपण युद्धात आहोत. हमासच्या दहशतवाद्यांना अद्दल घडवली जाईल,” अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला ठणकावलं आहे.
इस्रायलमधील भारतीयांना सूचना
इस्रायलमधील भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. “इस्रायलमधील परिस्थिती पाहता सगळ्या भारतीयांनी सतर्क राहावं. स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सुरक्षा नियमावलीचं पाल करावं. विनाकारण बाहेर फिरणे टाळावं. अधिक मदतीसाठी भारतीय दुतावासाशी संपर्क साधावा,” असं भारतीय दुतावासानं पत्रक काढत म्हटलं आहे.
दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एका पॅलेस्टाइनचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे.