वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’च्या उपग्रह ब्रॉडबँड सेवांचा जियो आणि भारती एअरटेलसारख्या भारतीय दूरसंचार कंपन्यांना मर्यादित धोका असल्याचे जेएम आर्थिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जियो आणि एअरटेलचे दर, इंटरनेटची चांगली गती आणि अमर्यादित डेटा या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याचे या अहवालाने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये ‘स्टारलिंक’ने आधी भारती एअरटेल आणि त्यानंतर जियो या दोन्ही कंपन्यांबरोबर भागीदारीचा करार केला आहे. या करारामुळे या दोन्ही कंपन्यांचे सध्याचे जाळे विस्तारण्यात मदत होईल. त्याच्या जोडीला दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये वेगवान इंटरनेट सेवा पुरवणे त्यांना शक्य होईल. सध्याच्या करारामध्ये इंटरनेट वितरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे,

दरांची तुलना करता, जागतिक पातळीवर ‘स्टारलिंक’ आणि अन्य सॅटकॉम कंपन्यांचे दर दरमहा १० ते ५०० डॉलर इतके आहेत. त्याउलट भारतीय दूरसंचार कंपन्या दरमहा पाच ते सात डॉलर इतक्या कमी खर्चात इंटरनेट सेवा प्रदान करतात. साधारणत: ४७ डॉलरमध्ये १ जीबीपी दर आणि स्ट्रीमिंग सेवा (ओटीटीसाठी) दिला जातो. ‘स्टारलिंक’च्या प्लॅनमध्ये मर्यादित डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे तर जियो व एअरटेलच्या मर्यादित डेटाचे प्लॅन आहेत. भारतातील ग्राहक कोणतीही खरेदी करताना दराचा विचार करतात, त्यामुळे ‘स्टारलिंक’च्या महागड्या सेवांना सहज ग्राहक उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे असे या अहवालात म्हटले आहे.