भारतीय उपखंडातील वाढत्या इस्लामिक दहशतवादाचे भारतापुढे मोठे आव्हान असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी सांगितले. नुकत्याच झालेल्या काही घटना पाहता, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. कट्टर इस्लामिक दहशतवादाचा पुरस्कार करणारी ‘इसिस’ ही संघटना सिरीया आणि इराक या देशांमध्ये जन्माला आली असली तरी, भारतीय उपखंडातदेखील ही संघटना विस्तारत असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी पाकिस्तानवर निशाणा साधताना, पाकिस्तानातील काही शक्ती भारतात अस्थिरता पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सीमारेषेवरील दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही संघटना असल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याशिवाय, भारतीय तरूणांना कट्टर धर्मवेडाच्या जाळ्यात ओढणारी ‘इसिस’ या संघटनेचेही भारतापुढे मोठे आव्हान असल्याचे राजनाथ यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच ‘अल-कायदा’ या दहशतवादी संघटनेतर्फे भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा देण्यात आलेला इशारा आम्ही गंभीरपणे घेतला असून, भारतीय सुरक्षा व्यवस्था हे आक्रमण थोपवून धरण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी म्हटले. शुक्रवारी कल्याणमधील आरिफ माजिद हा तरूण ‘इसिस’ची साथ सोडून भारतात परतला होता. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे.