मागील एका आठवड्यापासून राजस्थानात सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला असून, घडत असलेल्या राजकीय घटनांकडे देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत बहुमत सिद्ध करण्यासाठी घाई करत असताना राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी सचिन पायलट यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. “देशातील इतिहास असा आहे की, ज्यांच्याकडे कमी आमदार होते. ते मुख्यमंत्री बनले आहेत. जर परिस्थिती जुळून आली, तर सचिन पायलटही मुख्यमंत्री होऊ शकतात,” असं पुनिया यांनी म्हटलं आहे.

राजस्थानात राजकीय घडामोडी घडत असताना भाजपाचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतिश पुनिया यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं आहे. “राज्य सरकारनं उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करायला हवी. त्यानंतर सभागृहाचं अधिवेशन बोलवायला पाहिजे. राजस्थानातील राजकीय चित्र अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे भाजपानं कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण, काहीही घडणं शक्य आहे,” असं पुनिया म्हणाले.

आणखी वाचा- राज्यपाल विरुद्ध गेहलोत; काँग्रेस आमदारांची राजभवनात निर्दर्शनं

“जर परिस्थिती जुळून आली, तर सचिन पायलट मुख्यमंत्री होऊ शकतात. सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री होण्यासाठीच बंडखोरी केली आहे. देशात असाही इतिहास आहे की, ज्यांच्याकडे सर्वात कमी आमदार होते, तेही मुख्यमंत्री बनले,” असं म्हणत पुनिया यांनी राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

आणखी वाचा- “…तर मी पायलट यांचे स्वागत करेन”; अशोक गहलोत यांची ‘ऑफर’

“सध्या हे प्रकरण न्यायालयात असून, त्यावर जास्त भाष्य करू शकत नाही. हे प्रकरण न्यायालयात असल्यानं राजस्थान विधानसभेचे अधिवेशन घेता येणार नाही. कारण दोन्ही घटनात्मक संस्था असून, त्यांच्यामध्ये अधिकारावरून वाद घालू शकत नाही,” असंही पुनिया म्हणाले.

आणखी वाचा- “भाजपानं संविधानाची सर्कस केली, तर लोकशाहीला द्रौपदी”; काँग्रेसला संताप अनावर

सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्यावर भाजपासोबत सरकार पाडण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याचंही गेहलोत म्हणाले होते. सध्या गेहलोत आणि पायलट यांच्यातील संबंध टोकाला गेले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटीसीला पायलट समर्थकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असून, न्यायालय काय निर्णय देते, यावर राजस्थानच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरू शकते.