नवी दिल्ली : काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाचे उमेदवार शशी थरूर यांनी पुन्हा पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. मी विविध राज्यांमध्ये निवडणूक प्रचाराला जात असून तिथे प्रदेशाध्यक्ष मला भेटत नाहीत. मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला मात्र ते उत्साहाने जात आहेत. मला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे, हे कोणाला दिसत नाही का, असा सवाल थरूर यांनी केला.

थरूर यांनी निवडणूक लढवण्याची समान संधी दिली जात नसल्याची तक्रार काँग्रेसचे निवडणूक विभागाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे केली होती. त्यावर मिस्त्री यांनी उघडपणे भाष्य करण्यास नकार दिला; पण दोन्ही उमेदवारांना जिंकण्याची समान संधी निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिली असल्याचे मिस्त्री म्हणाले. मिस्त्रींच्या भूमिकेबद्दल वा प्रदेशाध्यक्षांबद्दल माझी नाराजी नाही; पण मला आणि खरगेंना मिळणाऱ्या वागणुकीमध्ये फरक आहे, एवढेच मला म्हणायचे आहे. खरगे हे माझे वरिष्ठ सहकारी आहेत, त्यांच्यासोबत मी अनेक वर्षे काम केलेले आहे. आम्ही दोघेही काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असा मुद्दा थरूर यांनी मांडला आहे.

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणी अधिकृत उमेदवार नाही, असे सांगितले जात असले तरी, खरगेंना मते देण्यासाठी प्रदेश प्रतिनिधींवर (मतदार) दबाव आणला जात आहे, असा दावा थरूर यांनी केला आहे. गांधी कुटुंबाने कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, तर हा दबावाचा खेळ का खेळला जात आहे, असा प्रश्न थरूर यांनी उपस्थित केला आहे. थरूर यांचा हा आरोप मिस्त्री यांनी फेटाळून लावला आहे. पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक गुप्त पद्धतीने होणार असेल तर, प्रदेश प्रतिनिधींना घाबरण्याजोगे काहीही नाही. मतदान कोणाला केले हे समजणारच नसेल तर, कोणावरही दबाव आणून कोणालाही लाभ होणार नाही, असे प्रत्युत्तर मिस्त्रींनी दिली आहे.

खरगेंनी आरोप फेटाळला

काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचे थरूर यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी गांधी कुटुंबाचा अधिकृत उमेदवार असल्याचा आरोप फेटाळला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या चोवीस तास आधी मला उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह केला गेला. हा आग्रह काँग्रेमधील बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला होता. त्यांच्या विनंतीचा मान राखून निवडणुकीत उतरल्याचे खरगे यांनी सांगितले. थरूर यांच्या आरोपांवर खरगे यांनी थेट प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र, माझे प्रचारक प्रदेश प्रतिनिधींना भेटत असून मला मतदान करण्याचे आवाहन त्यांना करत आहेत, असे खरगेंनी पत्रकारांना सांगितले.

Story img Loader