भारताला पाकिस्तानसमवेत शांततेचे आणि सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे, मात्र त्यासाठी प्रादेशिक अखंडत्वाशी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ठणकावले आहे. त्याचप्रमाणे सीमेपलीकडून होणारा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादही सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रणब मुखर्जी यांनी येथे दिला.
भारतातील दहशतवादी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत नसल्याचा पाकिस्तानने केलेला दावा राष्ट्रपतींनी सपशेल फेटाळला. दहशतवादी स्वर्गातून येत नाहीत तर शेजारी देशाचे ज्या प्रांतावर नियंत्रण आहे तेथूनच ते येत आहेत, असेही मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती बेल्जियमच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. पाकिस्तानातील दहशतवादाचे जाळे नष्ट करण्याची नितांत गरज असल्याचेही मुखर्जी म्हणाले. भारतातील दहशतवादी कारवाया ‘पाकिस्तान पुरस्कृत’ नाहीत, हा शब्दप्रयोग पाकिस्तानकडून केला जात आहे, असेही ते म्हणाले.
भारतातील दहशतवादी कारवाया कदाचित पाकिस्तान पुरस्कृत नसतीलही, पण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी स्वर्गातून येतात का, असा सवाल राष्ट्रपतींनी केला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी त्या देशाच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रांतातूनच येतात, असेही ते म्हणाले.
भारतासाठी घातक ठरणाऱ्या शक्तींना आमच्या भूमीचा वापर करू दिला जाणार नाही, असे आश्वासन २००४ मध्ये पाकिस्तानने दिले होते, याकडेही राष्ट्रपतींनी लक्ष वेधले.
भारताला कोणतीही प्रांतीय महत्त्वाकांक्षा नाही, शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंधच आम्हाला हवे आहेत, मात्र त्यासाठी आमच्या प्रादेशिक अखंडत्वाशी तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करून मुखर्जी यांनी सिमला कराराचा उल्लेख केला. तथापि कोणताही देश आपल्या प्रादेशिक अखंडत्वाशी तडजोड करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
राष्ट्रपतींकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय हुतात्म्यांना श्रद्धांजली
पहिल्या महायुद्धात हौतात्म्य पत्करलेल्या हजारो भारतीय जवानांच्या स्मृतीस शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बेल्झियमची राजधानी ब्रुसेल्स येथे श्रद्धांजली वाहिली़  राष्ट्रपती सध्या एका परिषदेसाठी बेल्झियमच्या दौऱ्यावर आहेत़  येथील युद्घ स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली़
हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाजवळ राष्ट्रपती आल़े  त्यांनी येथील दीपज्योतीला अभिवादन केले आणि सैनिकी मानवंदना देण्यात आली़  त्यानंतर मिनिटभराची शांतता पाळण्यात आली़  येथील अभिप्राय वहीत राष्ट्रपतींनी लिहिले की, ‘पहिल्या महायुद्धात रणांगणावर हौतात्म्य प्राप्त झालेल्या अनाम जवानांना मी आदरांजली वाहतो़  त्यात भारतीय जवानही आहेत, ज्यांनी युरोपच्या रणांगणावर शौर्य गाजविल़े  मी त्यांनाही श्रद्धांजली वाहतो़ ’ युद्धाचे जगावर किती भीषण परिणाम होतात़, याची इथे उभे राहिल्यावर आठवणी होत़े आणि महात्मा गांधी यांचा संदेश सांगणे औचित्याचे ठरते, ‘शांतीकडे जाणारा कोणताही मार्ग नाही, शांती हाच मार्ग आह़े’ येथे दोन्ही महायुद्धातील स्मारक बांधण्यात भारताच्या सहभागासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितल़े

Story img Loader