भारतीय हवामान विभागाकडून पुढील वर्षीपासून राज्यनिहाय मान्सून अंदाज दिला जाईल, असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की भारतीय हवामान विभाग २०१७ पासून प्रत्येक राज्यनिहाय मान्सूनचा अंदाज देईल. २०१८-१९ पासून हवामान अंदाज मान्सूनबरोबरच इतर ऋतूतही उपलब्ध करून दिला जाईल, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे सचिव एम.राजीवन यांनी सांगितले.
हर्षवर्धन म्हणाले, की राष्ट्रीय मान्सून प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील गतिशील असे प्रारूप सध्या तयार केले जातक असून मोठे संगणक त्यासाठी बसवण्यात आले आहेत. पुढील वर्षी महिन्याची हवामान अंदाज प्रारूपे तयार केली जातील व ते काम प्रगतिपथावर आहे. येत्या दोन तीन वर्षांत गट पातळीवरही हवामान अंदाज देण्याच्या दृष्टीने योजना सुरू आहे. सध्या भारतीय हवामान खाते मान्सूनचा रोजचा अंदाज विभागनिहाय देत आहे. वायव्य, मध्य भारत, दक्षिण द्वीपकल्प, पूर्व व ईशान्य भाग याप्रमाणे अंदाज सध्या दिले जातात पण आता आणखी उपविभागीय अंदाज दिले जातील. पृथ्वी विज्ञान खात्याने राष्ट्रीय मान्सून कार्यक्रम राबवला असून त्यात अत्याधुनिक पद्धतीने मान्सूनचा पावसाचा अंदाज विविध वेळांनुसार दिला जाईल, भारतीय उष्णकटिबंधीय हवामान प्रयोगशाळा पुण्यात आहे त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आयआयटीएम अमेरिकेच्या एनसीइपी या संस्थेची मदत घेणार असून एनएमएम अंतर्गत शैक्षणिक संस्थाही त्यात सहभागी होणार आहे. सध्या एनएसइपीच्या प्रारूपांवर आधारित पद्धतीला आधारभूत मानले जाणार आहे.

Story img Loader